लातूर : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचा पार्थिव खास विमानाने बुधवारी सकाळी ८ वाजता लातूर विमानतळावर आणण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने तयारी केली असून, पार्थिवाच्या खास विमानासह अन्य चार विमानांची लातूर प्रशासनाकडे नोंद झाली आहे. विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवला असून, एक हजार जवान तैनात केले आहेत. शिवाय, उपजिल्हाधिकारी दर्जाचे आठ अधिकारी, दहा तहसीलदार विमानतळावर नियोजन करीत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज हे स्वतंत्र विमानाने बुधवारी सकाळी आठ वाजता लातूर विमानतळावर पोहोचणार आहेत. त्याचबरोबर मुंडे यांचे पार्थिव असलेले खास विमानही लातूर विमानतळावर लँड होणार आहे. विमानतळावरून पीव्हीआर चौक-रिंग रोड मार्गे नवीन रेणापूर नाक्याकडून परळीकडे गोपीनाथ मुंडे यांचा पार्थिव नेण्यात येणार आहे. विमानतळावर कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाच्या रेस्ट हाऊस परिसरात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून विमानतळाकडे कार्यकर्त्यांना पायी जावे लागणार आहे. तिकडे वाहने नेण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. विमानतळावर एक तास पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर परळीकडे पार्थिव नेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर यांनी दिली. (प्रतिनिधी) विमानतळावर वाहने नेता येणार नाहीत..! लातूर विमानतळावर दिल्ली, मुंबई व महाराष्ट्रातून अनेक मान्यवर गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीसाठी येणार आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी विमानतळावर वाहने घेऊन येऊ नयेत. वनविभागाच्या विश्रामगृह परिसरापर्यंतच वाहने आणावीत. जेणेकरून बाहेरगावाहून येणार्या पाहुण्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर यांनी केली आहे. बीदर, उस्मानाबाद, नांदेडलाही उतरतील विमाने... गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीसाठी कितीही विमान आले तरी लातूर विमानतळावर लँड केले जातील. पाहुणे विमानतळावर उतरल्यानंतर बीदर, उस्मानाबाद व नांदेडला लँडिंगची सोय करण्यात येणार आहे. सध्या लातूर विमानतळावर सहा विमाने थांबण्याची सोय आहे. यापेक्षा अधिक विमान आल्यास बीदर, उस्मानाबाद व नांदेड विमानतळांची सोय आहे. याबाबतची सर्व दक्षता घेण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले. मंगळवारी धावली मुंबई-लातूर विशेष रेल्वे गोपीनाथराव मुंडे यांच्या पार्थिवावर परळी येथे बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ अंत्यसंस्कारासाठी येणार्यांची सोय व्हावी, यासाठी मंगळवारी रात्री १०़३० वाजता मुंबई-लातूर विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे़ विशेष रेल्वेतून राज्य मंत्रीमंडळातील काही मंत्री, आमदार, तसेच मुंबई येथील कार्यकर्ते येणार असल्याची माहिती आहे़ बुधवारी सकाळी ही रेल्वे लातूरच्या रेल्वेस्थानकावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ लातूर विमानतळ ते परळी मार्गावर पोलिस बंदोबस्त... पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसह सहा डीवायएसपी, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे ६० अधिकारी तसेच नांदेडहून २० अधिकारी, ३०० पोलिस, आणि लातूर शहरातील ६०० पोलिस असा एकूण एक हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत नियोजन... जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार लातूर शहरातील सर्व अधिकार्यांची बैठक जिल्हाधिकार्यांच्या दालनात मंगळवारी घेण्यात आली. बैठकीत अधिकार्यांना दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, डॉ. अनंत गव्हाणे, पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर यांच्यासह सर्व अधिकार्यांची यावेळी उपस्थिती होती.
गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव आज लातुरात
By admin | Updated: June 4, 2014 01:31 IST