सोनपेठ : तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र शेतकरी शुगर या कारखान्याच्या साखरेच्या गोदामाला आग लागून साखरेसहीत गोदामाचे ४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारखान्याच्या लगत असलेल्या गोदामात साखर ठेवण्यात आली होती. २६ जूनच्या पहाटे गोदामात धूर निघत असल्याचे पहारेकऱ्यांना दिसले. त्यांनी प्रशासकीय अधिकारी उदय देशमुख यांना माहिती दिल्यानंतर त्यांंनी अग्नीशामक दलाला पाचारण केले. गंगाखेड, परळी न. प. व परळी औष्णिक विद्युत केंद्र या तीन अग्नीशामक दलांनी दुपारी साडेचार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. आगीत १ लाख ६० क्विंटल साखर आगीच्या भक्षस्थानी पडली. ४५ कोटी रुपयांच्या साखरेबरोबर सव्वाकोटी रुपये गोदामाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळाला कारखान्याचे चेअरमन अभिजित देशमुख, तहसीलदार अभिजित पाटील यांंनी भेटी दिल्या. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. (वार्ताहर)
गोदामाला आग; ४६ कोटींचे नुकसान
By admin | Updated: June 27, 2014 00:08 IST