लातूर : लातूरचा शिक्षणातील पॅटर्न प्रसिध्द आहे. या पॅटर्नमुळे राज्यातील विद्यार्थी लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात शिकायला येतात. महापालिकेत भाजपाची सत्ता द्या, शिक्षणाबरोबर या शहरात विकासाचा असा पॅटर्न राबवू की राज्यातील लोक आम्हाला ‘लातूर पॅटर्न’प्रमाणे विकास करायचा आहे अशी मागणी करु लागतील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी लातूरकरांना आवाहन केले. सोमवारी येथील टाऊन हॉलवर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी महापौर अख्तर मिस्त्री यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लातूरचा विकास झाला आहे काय ? जागोजागी कचऱ्याचे ढिग, उघड्या गटारी त्यावरचे डास आणि त्यातून निर्माण होणारे डेंग्यु, मलेरिया, स्वाईन फ्लूसारखे आजार. हेच लातूर आहे का ? मांजरा भरलेले असूनही १५ दिवसातून पाणी दिले जातेय, हा लातूरचा विकास आहे का ? जर लातूरल्या विकासाचा पॅटर्न निर्माण करायचा असेल तर देशात भाजपा, राज्यात भाजपा आणि लातुरात भाजपा असे समीकरण आणावे. जी हुशारी पुण्याच्या लोकांनी केली. मुंबईच्या लोकांनी केली. पिंपरीच्या लोकांनी केली. अमरावतीच्या लोकांनी केली. सोलापूरच्या लोकांनी केली. आता लातूरची जनता तर हुशार जनता आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण बहुमताने महापालिका द्यावी आणि लातूर शहर बदलून दाखवितो, असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षणासारखाच लातूरला ‘विकासाचा पॅटर्न’ देऊ: मुख्यमंत्री
By admin | Updated: April 17, 2017 23:35 IST