लोकमत न्यूज नेटवर्कजालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने भौगोलिकप्रदेश, कोरडवाहू, बागायती, असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना प्रचलित बाजारभावाच्या चार पट मोबदला द्यावा. अन्यथा समृद्धी महामार्गास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध कायम राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.नियोजित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका लोकप्रतिनिधींना कळावी यासाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीस राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आ.राजेश टोपे, अण्णा सावंत, शेतकरी हक्क व कृती समितीचे, प्रशांत गाढे, राम सावंत, देविदास जिगे, प्रशांत वाढेकर, भाऊसाहेब घुगे, बाळासाहेब वाकुळणीकर, अॅड. संजय काळाबांडे, विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती.समृद्धी महामार्गात बागायत जमीन जाणार असल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र, तुलनेत शासन देत असलेला मोबदला अत्यंत कमी आहे. त्यामुळे बैठकीस उपस्थित बदनापूर व जालना तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गास जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवला. आ. टोपे म्हणाले की, महामार्गात जमीन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला दीड कोटी आणि दुसऱ्याला पंधरा लाख रुपये मोबदला निश्चित करणे, हे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांचा महामार्गास विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे हित जोपासण्याचे काम करू. महामार्गाबाबत राज्यातील शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे सोमवारी औरंगाबादला बैठक घेणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे टोपे म्हणाले. अण्णा सावंत म्हणाले, की नागपूर- मुंबईला जोडण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून समृद्धी महामार्ग बांधून घ्यायचा आणि विदर्भ वेगळा करायचा शासनाचा डाव आहे. कर्ज काढून महामार्ग बांधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. बैठकीस गेंदालाल झुंगे, प्रकाश कान्हेरे, उध्दव गिते, चंद्रकांत क्षीरसागर, उदय काकडे, संतोष गाजरे, भास्कर वाढेकर, विठ्ठल टेकाळे, शाम लांडगे, राजेंद्र काकडे, अंबादास गिते, शेख रशीद यांच्यासह बदनापूर व जालना तालुक्यातील पंचवीस गावांतील शेतकरी उपस्थित होते.
बाजारभावाच्या चारपट दर द्या..!
By admin | Updated: June 9, 2017 01:00 IST