जालना : चार नगरपंचायतींसाठी मंगळवारी नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात घनसावंगी, बदनापूर व जाफराबाद नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे तर मंठ्यात शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. जाफराबाद नगरपंचायत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नसरीन बेगम साऊद तर उपनगराध्यक्ष दीपक पाटील वाकडे यांची अकरा विरुद्ध सहा मतांनी निवड झाली. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नसरीन बेगम सऊद, अपक्ष पठाण सईदा सफाराजखॉन यांनी तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे दीपक पा. वाकडे व कॉंग्रेस पक्षाकडून सय्यद महेमूद अलम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सभागृहात घेण्यात आलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत नगराध्यक्षपदासाठी अकरा विरूद्ध सहा तर उपनगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या नगरसेवक प्रमिला अनिल बोर्डे गैरहजर राहिल्याने अकरा विरूद्ध पाच मतांनी उपनगराध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने फटाक्यांची आतषबाजी करु न आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी आ.चंद्रकांत दानवे, तालुकाध्यक्ष राजेश पा. चव्हाण सुधाकर दानवे, सुधीर पाटील, शहराध्यक्ष शेख कौसर, कैलास दिवटे रामभाऊ दुनगहु, बंटी औटी, साहेबराव लोखंडे, गजानन लोखंडे, नगरसेवक सुरेखा लहाने, मंगला शेवाळे, फारु ख कुरेशी, शेखा अहमद रहीम, मीराबाई जयस्वाल, कविता वाकडे, शेख शबाना परवीन यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बदनापूर : बदनापूर नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या चित्रलेखा पांडुरंग जऱ्हाड व उपनगराध्यक्षपदी शेख युनूस लालमिया यांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या चित्रलेखा पांडुरंग जऱ्हाड या ११ मते घेऊन विजयी झाल्या. मंगला जगन्नाथ बारगाजे यांना ६ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे शेख युनूस लालमिया व शिवसेना-भाजपायुतीचे गोरखनाथ खैरे यांच्यात लढत झाली त्यामध्ये शेख युनूस लालमिया हे ११ मतांनी विजयी झाले. गोरखनाथ खैरे यांना ६ मते मिळाली. शहराचा सर्वांगिण विकास करणार असल्याचे नूतन नगराध्यक्षा चित्रलेखा जऱ्हाड यांनी सांगितले. घनसावंगी: येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. यात अध्यक्षपदी योजना देशमुख तर उपाध्यक्षपदी श्याम धाईत यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाली. यावेळी सेना, भाजप व अपक्ष उमेदवार या प्रक्रियेपासून अलिप्त राहिले. नूतन नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचे माजी खा.अंकुशराव टोपे, आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार अहमद देशमुख यांनी स्वागत केले. मंठा नगरपंचायत मंठा : नवनिर्वाचित मंठा नगर पंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, शिवसेनेच्या पार्वती कैलास बोराडे तर उपनगराध्यक्षपदी बालासाहेब जिजाभाऊ बोराडे यांची निवड झाली. शिवसेनेच्या पार्वती कैलास बोराडे यांना ९ तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या मीरा मोरे यांना ८ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे बालासाहेब जीजाभाऊ बोराडे यांना ९ तर काँग्रेसच्या बिलकीस मोईन कुरेशी यांना ८ मते मिळाली. काँग्रेसकडून दिलकीस मोईन कुरेशी एकही मत मिळू शकले नाही. (वार्ताहर)
घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे तर मंठ्यात शिवसेनेचा नगराध्यक्ष
By admin | Updated: November 25, 2015 00:19 IST