बीड : घराची कळा अंगण सांगत असते. त्याप्रमाणेच गावाची ओळख स्वच्छतेतून होत असते. त्यामुळे गड्यांनो...शौचालय बांधून घ्या..! बायाबापड्यांना उघड्यावर पाठवू नका...असे आवाहन अस्सल ग्रामीण शैलीत चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गुरूवारी केले.वांगी येथे नाम फाऊंडेशनच्या वतीने जलसंधारण कामाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी जि.प.चे डेप्युटी सीईओ डॉ. सुनील भोकरे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे, नामचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, जिल्हा समन्वयक शिवराम घोडके, डॉ. प्रदीप शेळके, अनिल शेळके यांची उपस्थिती होती.अनासपुरे पुढे म्हणाले, लोकसहभागाशिवाय विकासाला चालना मिळत नाही. ज्यावेळी गावाच्या विकासाचा प्रश्न पुढे येईल तेव्हा आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकीने लढले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आजही महिला शौचासाठी उघड्यावर जातात हे चित्र महाराष्ट्राला शोभणारे नाही. महिला, मुलींना दागिने करता. मग, अनुदान असतानाही शौचालय का बांधत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वांगी गाव दोन महिन्यात पाणंदमुक्त झाले पाहिजे. त्यादृष्टीने ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.दुष्काळी परिस्थितीत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून गतवर्षी मराठवाड्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली होती. या माध्यमातून अनेक गावांचे चित्र पालटले आहे. ठिकठिकाणच्या धरण, बंधाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून शिवार हिरवागार होण्यास मदत झाली आहे. यावेळी देखील अनेक गावांमधून कामांची मागणी होत आहे. अनेकांच्या मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे, असेही मकरंद अनासपुरे म्हणाले. यावेळी राजाभाऊ शेळके, शिवराम घोडके यांनी नामने केलेल्या कामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वांगी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मकरंद अनासपुरे यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फीचा मोह आवरता आला नाही. (प्रतिनिधी)
गड्यांनो...शौचालय बांधा!
By admin | Updated: March 10, 2017 00:18 IST