गेवराई : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर तालुक्याचे राजकीय वर्तुळ ऐन हिवाळ्यात तापले आहे. गुरूवारी आ. लक्ष्मण पवार यांच्यावर विनयभंग व अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद झाल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी शहरात उमटले. अखेर पालकमंत्री पंकजा मुंडे पवारांच्या मदतीला धावून आल्या.पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान राकाँ कार्यकर्त्याशी झालेल्या वादावरून ठिणगी पडली असली तरी आता हा वाद पवार विरुद्ध पंडित असा शिगेला पोहचला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालताना टीकास्त्र सोडले. त्यांच्या भाषणाचा रोख आ. अमरसिंह पंडित यांच्याकडेच होता हे लपून राहिले नाही.तथापि, सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच ठाण्यासमोर ठिय्या देत पोलिसांविरुद्ध नाराजी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत आ. पवार यांना हस्तक्षेप करण्याची गरज काय ? असा सवाल उपस्थित करून आ. अमरसिंह पंडित, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनाही राजकारणासाठी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात गोवले जाण्याची शक्यता पंडित गटाने वर्तविली आहे. (वार्ताहर)
गेवराईचे राजकारण तापले
By admin | Updated: January 20, 2017 23:51 IST