उमरगा : यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा वारंवार अडचणीत आला. ऐन मोसमात निसर्गाचा फटका आंबा पिकालाही बसला. वादळी वारे आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने उमरगा तालुक्यासह जिल्ह्यातील आंबा फळांचे मोठे नुकसान झाले. यामुळे गावरान आंबा तर बाजारात विक्रीसाठी आलाच नाही. तरीही आमरसाच्या शौकिनांची इच्छा पूर्ण करण्यासाठी उमरगा शहरातील व्यापाऱ्यांनी परराज्यातून आंबा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.उमरगा शहरात विविध जातीच्या आंब्यांची आवक वाढली आहे. यात केशर, दशहरी, रुमाली, लंगडा, बदाम, मायमुद्रा, कायरी, मल्लिका आदी अनेक जातीचे आंबे यंदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र यात गावरान आंबा दुर्मिळ झाल्याचे दिसून येत आहे. मोहोर लगडल्यापासून ते आंबा पाडाला येईपर्यंत वादळी वारे व अवकाळी पावसाच्या माध्यमातून निसर्गाने सतत तडाखा दिला. त्यामुळे गावरान आंबा यंदा चाखायला मिळणे कठीण झाले आहे. एवढेच नव्हे तर तो बाजारातही विक्रीसाठी अद्याप उपलब्ध झाला नाही. यावर पर्याय म्हणून उमरगा शहरातील आंब्याच्या व्यापाऱ्यांनी शेजारील आंध्र प्रदेशातील जहिराबाद येथून विविध जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. जहिराबाद येथे आंब्याचा मोठा बाजार भरतो. जून महिन्यात कारहुन्नवी या सणाच्या निमित्ताने येथे आंबा मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जातो. या आंब्याची उमरगा शहरात आवक वाढली असून, विविध जातीच्या या आंब्याला प्रतिकिलो ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत किंमत मोजली जात असल्याचे दिसते. (वार्ताहर)
बाजारपेठेत गावरान आंबा झाला दुर्मिळ
By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST