उस्मानाबाद : ‘आठवडी बाजारात दागिने घालून जावू नका’, असे सांगत एका महिलेचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील देशपांडे स्टँडनजीक घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील गणेशनगर भागात राहणाऱ्या कमलाबाई घोडके या रविवारी आठवडी बाजारात गेल्या होत्या. बाजार उरकून घराकडे परतत असताना देशपांडे स्टँटनजीक दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. यावेळी त्यांनी ‘तुम्ही पेपर वाचला नाही का? कालच एकाच महिलेचे गंठण चोरून नेले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा’, असे सांगितले. सदरील महिलेने अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवल्यानंतर या अज्ञात इसमांनी ते व्यवस्थित ठेवले आहेत की नाही, याची पाहणी करीत ते दागिने लंपास केले.ही बाब लक्षात आल्यानंतर घोडके यांनी तात्काळ शहर पोलिस ठाणे गाठून घडलेली घटना सांगितली. आपल्याकडील दोन गंठण, एक बोरमाळ व अन्य दागिने असा एकूण ३५ हजारांचा ऐवज या चोरट्यांनी पळवून नेल्याची फिर्याद त्यांनी दिल्यावरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
दागिने पळविले
By admin | Updated: May 18, 2015 00:19 IST