जालना : घनसावंगी तालुक्यातील आरगडेगव्हाण येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा अनागोंदी कारभार सुरु असून, मृतांच्या नावेदेखील धान्याची उचल केली जात आहे. मात्र, तहसील प्रशासन या दुकानदाराला अभय देत असल्याचा आरोप भाऊसाहेब सूर्यभान रंधे यांनी पुराव्यानिशी केला आहे.याबाबत रंधे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. तत्पूर्वी त्यांनी घनसावंगीच्या तहसीलदारांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु स्वस्तधान्य दुकानाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात आलेली नाही. परिणामी दुकानदाराचे मनोधैर्य वाढले आहे. ‘तहसील प्रशासन माझ्या म्हणण्यानुसार चालते’ असा दम दुकानदार देत असल्याचा आरोप रंधे यांनी निवेदनात केला आहे. दुकानदाराने हितसंबंध जपण्यासाठी धनदांडग्यांची नावे दारिद्र्यरेषेत टाकून त्यांना बीपीएल, एपीएलच्या शिधापत्रिका उपलब्ध करुन दिल्या आणि गरजवंतांना साधी शिधापत्रिकाही दिली नाही, असे नमूद करुन रंधे यांनी पुढे म्हटले, तलाठी, तहसीलदार यांच्याशी दुकानदार रमेश शिंदे यांचे संगनमत असल्यामुळे कार्डधारकांना रॉकेलपासून वंचित ठेवले जात आहे. गावात आॅगस्ट २०१५ पासून धान्य वितरीत करण्यात आलेले नाही. १५ आॅगस्टपासून शेतकरी लाभार्थ्यांचे धान्य देखील वाटप झालेले नाही. प्रत्येक महिन्यात धान्य व रॉकेल उचलून सुध्दा कार्डधारकांना धान्य वाटप केले नाही. याद्यांमध्ये अनेकांची बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप रंधे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. (प्रतिनिधी)एकाच कुटुंबातील व्यक्ंितना वेगवेगळ्या योजनांमध्ये समाविष्ट करुन त्यांच्या नावे धान्य उचल करणे, मात्र वाटप न करता त्याची काळ्या बाजारात विक्री करणे, असे प्रकार सर्रासपणे केले जात असल्याचे रंधे यांचा आरोप आहे.४अंत्योदय, अन्न सुरक्षा, बीपीएल, पीडीएस या योजनेसाठी एकाच कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे.आरगडेगव्हाण येथील स्वस्ताधान्य दुकानदाराकडून वेगवेगळ्या प्रकारे होत असलेल्या गैरव्यवहाराच्या पुराव्याची जंत्रीच सूर्यभान रंधे यांनी सादर केली आहे. ज्यात लाभार्थ्यांच्या बोगस याद्या, मयत व स्थलांतरीतांची नावे, ५ कि.मी. अंतरापेक्षा दूूर असलेली २० कि.मी.अंतरावरील या दुकानास जोडलेल्या गावांची नावे निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.४गैरव्यवहाराचे पुरावे वारंवार देऊनही तहसील प्रशासन कारवाई का करीत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
आरगडे गव्हाणच्या स्वस्तधान्य दुकानाचा अनागोंदी कारभार!
By admin | Updated: December 20, 2015 23:46 IST