जालना : नगर पालिकेकडून मोठा लवाजमा घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असली तरी शहरातील अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे. ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली. विशेषत: अंतर्गत वसाहती, मुख्य रस्त्यांच्या कोपऱ्यावर कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत.जालना नगर पालिका स्वच्छ भारत अभियात अंतर्गत मोहीम राबवित आहे. या अंतर्गत शहरातील विविध भागात पालिकेकडून दररोज शेकडो टन कचरा उचलल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी शहर कचरामयच असल्याचे स्पष्ट होत आहे.दररोज कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेकडे आवश्यक वाहने उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे सफाई कामगारांची संख्याही कमी असल्याने कचरा दररोज उचलला जात नाही. मात्र तीन-चार दिवसांना का होईना कचरा उचलला जातो. काही भागात आठवडाभरापर्यंतही कचरा उचलला जात नाही. अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. टाऊन हॉल परिसरात नाल्यातून काढलेला कचरा तसाच पडून आहे. हा रस्ता पुन्हा नाल्यांमध्ये जाणार असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. जुना जालन्यातील नूतन वसाहत, मुक्तेश्वर तलावाचा परिसर, रेल्वेस्टेशन परिसर, शनिमंदिर, बाजार चौकी परिसर, शास्त्री मोहल्ला, छत्रपती कॉलनी, नीळकंठ नगर, कचेरी रोड, गणपती गल्ली, टाऊन हॉल, गांधीचमन, मस्तगड पॉवर हाऊस तसेच नवीन जालन्यातील सुभाष चौक, महावीर चौक, पाणीवेस, सरोजनीदेवी रोड, मामा चौक, देऊळगावराजा रोड, कन्हैय्यानगर, जेईएस कॉलेज रोड, रामनगर, गांधीनगर, शिवाजीपुतळा परिसर इत्यादी भागात कचरा साचला आहे. (प्रतिनिधी)
स्वच्छता अभियानाचा शहरात ‘कचरा’
By admin | Updated: May 23, 2015 00:37 IST