गंगापूर : येथील सहकारी साखर कारखान्याच्या गाजत असलेल्या १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणामध्ये गुरुवारी वैजापूर सत्र न्यायालयाने आणखी तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. भीमराव पांडव, नारायण विश्वनाथ वाकळे व कृष्णकांत भगवान व्यवहारे अशी तिघांची नावे आहेत.
गंगापूर साखर कारखान्यातील अपहार प्रकरणात १६ जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी भीमराव पांडव, नारायण वाकळे व कृष्णकांत व्यवहारे यांनी वैजापूर सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रसंगी आरोपींच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, ते तिघेही कारखान्याचे सभासद नाहीत. त्यांनी कारखान्याच्या आवाहनावरून १० लाख, ५ लाख व ७ लाख इतकी रक्कम अनामत म्हणून कारखान्याला दिली होती. शेतकऱ्यांनी जीपीए व संमतीपत्र दिल्यामुळे कारखान्याकडून त्यांच्या खात्यावर लासूर स्टेशन येथील वैजापूर मर्चंट बँकेतून रक्कम वर्ग झालेली आहे. त्यावरून त्यांनी त्यांच्या खात्यावरून काही शेतकऱ्यांच्या नावावर आरटीजीएसद्वारे पैसे पाठविले. यामध्ये कुठलाही अपहार केलेला नसल्याचे सांगितले. यावर आपण सभासद नाही, तुमचा कारखान्याशी संबंध जर नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे का पाठविले, कारखान्याने हे काम का केले नाही, तुम्ही एवढे उदारवादी झाले का, असा प्रश्न कोर्टाने आरोपींना केला. या प्रकरणामध्ये मोठ्या रकमेची आर्थिक अफरातफर असल्याने व त्यामध्ये जनतेचा पैसा असल्याने सरकार पक्षाला नोटीस काढून ९ तारखेला म्हणणे सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तसेच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याप्रकरणी आता ९ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.