बीड : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बनावट आरसीबुक तयार करणारी टोळी शुक्रवारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी येथे पकडली. या टोळीत तिघांचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.शहरामध्ये बनावट चेसीज, इंजिन क्रमांक टाकून वाहने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यावरून सहाय्यक निरीक्षक राहूल देशपांडे यांनी चौकशी केली. तेव्हा चार वाहनांचे पासबुक बनावट असल्याचे निष्पन्न झाले. कंपनीने टाकलेल्या इंजिनवर पंचिंग करून त्यावरून बनावट क्रमांक टाकण्याचा फंडा या टोळीने राबविला होता. त्या आधारे तीन जीप, एक ट्रक अशी चार वाहने स्वत:च्या नावावर केली होती. या आरसीबुकवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षऱ्या आहेत. शिवाय क्रमांक देखील बनावट टाकलेला आहे. या बनावट आरसीबुक आधारे या वाहनांची विक्री केल्याचेही तपासात समोर आले आहे. ही वाहने चोरीची असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. चौकशीअंतीच सारे समोर येईल, असे निरीक्षक सी. डी. शेवगण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बनावट आरसीबुक बनवणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: February 22, 2015 00:38 IST