औरंगाबाद : सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा रक्तदान करून घेण्यावर भर दिला असून, या माध्यमातून ५ दिवसांत १५०० जणांनी रक्तदान केले. रक्तदान करून महान दान करण्याची ही परंपरा शहरवासीयांनी या माध्यमातून जपली आहे. गणेशोत्सवात सामाजिक कार्य करण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येतो. यंदा शहरातील गणेश मंडळांनी रक्तदान शिबीर घेण्याला पसंती दर्शवीली आहे. शहरातील सर्व रक्तपेढ्या दररोज प्रत्येकी दोन ते चार शिबिरांत रक्त संकलित करीत आहेत. सिडको एन-१ येथील सर्व्हिस इंडस्ट्रियल गणेश मंडळाने नुकतेच रक्तदान शिबीर घेतले. यात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोराटे, सचिन रेणावकर, मोहन पुंड, गणेश बोरसणे, बाबासाहेब पवार, रमेश गिराम, विठ्ठल कंसकर, पुरुषोत्तम घंगाळ आदींनी यासाठी परिश्रम घेतले. छावणीतील विनायक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन छावणीचे माजी उपाध्यक्ष अनिल जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात रखमाजी जाधव, विजय स्वामी, मधू जाधव, मदन गव्हाणे, चेतन मुगदिया, कुष्णा मोहिते आदींनी परिश्रम घेतले. याशिवाय शहरातीलच नव्हे, तर सिडको-हडको, जवाहर कॉलनी, गारखेडा परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी रक्तदान शिबीर घेतले. यासंदर्भात शेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमधील रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद फुलारी यांनी सांगितले की, शहरात ८ रक्तपेढ्या आहेत. मागील ५ दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक रक्तपेढी दररोज दोन ते चार मंडळांत रक्त संकलनाचे कार्य करीत आहे. मागील पाच दिवसांत शहरात १५०० जणांनी रक्तदान केले आहे. रक्तदानाविषयी समाजात जागृती मोठ्या प्रमाणात झाली असून गणेश मंडळ स्वत:हून रक्तपेढीशी संपर्क करीत आहेत.