उस्मानाबाद : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५ लाख ४९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात उद्दिष्टाहून अधिक म्हणजे, ६ लाख ६ हजार ६१७ रोपांची लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. असे असतानाच वन विभागाच्या वतीने घाटंग्री रस्त्यालगत असलेल्या वनक्षेत्रात लागवड केलेली रोपे कक्षरश: करपून जाऊ लागली आहेत. विशेष म्हणजे, या क्षेत्रात वृक्षारोपणाचे काम सुरू असल्याने वृक्षप्रेमींना वन विभागाच्या कारभाराबाबत ‘पुढे पाठ, मागे सपाट’ या युक्तीचा अनुभव येत आहे.उस्मानाबाद शहरापासून काही किमी अंतरावर आणि घाटंग्री रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या क्षेत्रातील काही भागात वृक्षांचे प्रमाण विरळ झाले आहे. अशा ठिकाणी वन विभागाकडून नव्याने रोपांची लागवड करण्यात येत आहे. परंतु, ही लागवड करताना खड्डे खोल खोदण्याची तसदी वन विभागाकडून घेतली जात नसल्याचे प्रत्यक्ष खड्डे पाहिल्यानंतर दिसून येते. विशेष म्हणजे, ही रोपे खड्ड्यामध्ये नव्हे, तर खड्ड्यातून निघालेल्या मातीच्या भरावावर लागवड केली आहेत. अनेक भरावाखाली दगडांच्या शिळा आहेत. त्यामुळे सदरील जागा वृक्षरोपनासाठी योग्य आहे की नाही, हे पाहण्याचे कष्टही वन विभागाने घेतले नाही. परिणामी अशा भरावांवरील रोपे करपून गेली आहेत. दरम्यान, लावगड केलेल्यापैकी सध्या पन्नास टक्केही रोपे जगण्याच्या अवस्थेत नाहीत. यानंतरही वन विभागाने रोपांच्या संगोपनाकडे लक्ष न दिल्यास आणखी पंधरा ते वीस टक्के रोपे वाया जाऊ शकतात. दरम्यान, लागवड केलेली रोपे योग्य संगोपनाअभावी करपून जात असताना दुसरीकडे मात्र, वृक्ष लागवडीचा सपाटा सुरूच आहे. त्यामुळे वन विभागाकडून वृक्षारोपणाचा हा फार्स दिखाव्यापुरता तर केला जात नाही ना, असा सवाल आता वृक्षप्रेमींतून उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. (प्रतिनिधी) खड्डे अर्धा फुटही नाही !वन विभागाने वृक्षारोपण करण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. हे खड्डेही फार खोल खोदण्यात आलेले नाहीत. साधारणपणे अर्धा फुट खोलीचे खड्डे आहेत. या खड्ड्यांतून निघालेल्या मातीच्या भरावावर रोपांची लागवड केली आहे. मातीमध्ये दगडांचे प्रमाण अधिक असल्याने लागवड केलेली रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे या पैकी किती रोपे जगतात? की नुसते खड्डेच शिल्लक राहतात, हे येणाऱ्या काळातच दिसून येईल.साठविलेली रोपेही गेली वाया?वन विभागाच्या वतीने वनक्षेत्राच रोपांचा स्टॉक करून ठेवण्यात आला आहे. हीच रोपे सदरील रोपे वनक्षेत्रात लागवड केली जात आहेत. परंतु, या रोपांचीही व्यवस्थीत देखभाल केली जात नसल्याने शेकडो रोपे करपून गेली आहेत. एकीकडे गरजेच्या प्रमाणात रोपे उपलब्ध नसल्याने शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी खाजगी रोपवाटीकांतून रोपे विकत घेऊन लागवड केली. तर दुसरीकडे वन विभागाने स्टॉक करून ठेवलेल्यापैकी मोठ्या प्रमाणात रोपे करपून गेली आहेत.
पुढे पाठ; मागे सपाट..!
By admin | Updated: July 18, 2016 01:05 IST