तुळजापूर : तालुक्यातील कसई गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. सदरील अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या जमावाने टँकर पेटवून दिले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कसई गावाला सध्या पंचायत समितीच्या टँकरद्वारे ( क्र. एम.टी.एल. ६७६०) पाणी पुरवठा सुरु आहे. मंगळवारी हे टँकर पाणी घेवून गावाकडे निघाले होते. याचवेळी वीटभट्टी कामगार पांडूरंग शिवराम कांबळे (वय ४७) हे दुचाकीवरुन (एम.एच. १२ एम. २२४७) गावाकडे निघाले होते. ओव्हरटेक करण्याच्या नादात पाणी घेवून टँकरची सदरील दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार पांडूरंग कांबळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सदरील अपघाताची माहिती ग्रामस्थांना मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. टँकर चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे सांगत संतप्त जमावाने चक्क या टँकरला आग लावली. यामध्ये टँकरची कॅबीन जळून खाक झाली आहे. कसई येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. परंतु, रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात कसलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. याबाबत तुळजापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
कसईत संतप्त जमावाने पाण्याचे टँकर पेटविले
By admin | Updated: August 19, 2015 00:01 IST