बीड : शिरुर तालुक्यातील शौचालय कामातील लाखोंचा घोटाळा ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर आता या घोटाळ््याचे वेगवेगळे पैलू बाहेर येऊ लागले आहेत. गोरगरिबांच्या घरकुलांसाठी आलेला लाखोंचा निधीही शौचालयासाठी वळविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिरुर येथील गटविकास अधिकारी बाबासाहेब सूर्यवंशी यांनी खिरापत वाटल्याप्रमाणे ग्रामपंचायतींना सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी वाटला. प्रत्यक्षात बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना ४ हजार ६०० रुपयांच्या अनुदानाची रक्कम मिळायला हवी; पण गटविकास अधिकारी इतके मेहेरबान का झाले? याची खातरजमा करण्याचे आव्हान आता चौकशी पथकापुढे आहे. शिरुर तालुक्यात ५२ ग्रामपंचायती आहेत; परंतु ठराविक दहा ग्रामपंचायातींनाच शौचालयासाठी निधी का दिला गेला? याचे उत्तरही गुलदस्त्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे येवलवाडी या गवातील ग्रामस्थांनी शौचालये बांधली आहेत; पण दोन महिन्यांपासून त्यांना अनुदान मिळालेले नाही. सखोल चौकशीपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले की, शिरुर तालुक्यातील शौचालय कामातील अनियमिततेची कसून चौकशी सूर आहे. पथक गावात जाऊन आले आहे. चौकशी पारदर्शक होईल. दोषी आढळणाऱ्यांची गय नाही, असा इशारा त्यांनी दिला़ (प्रतिनिधी)गुन्हे नोंद करण्याची मागणीगोरगरिबांना एकीकडे राहण्यासाठी डोक्यावर छप्पर नाही. रमाई आवास, इंदिरा घरकुल योजनेमुळे त्यांचे घराचे स्वप्न साकार होते; पण त्यांच्यासाठी आलेला निधीही आता शौचालयासाठी वळवून त्यात अपहार केला जात असेल तर ही बाब गंभीर आहे. गोरगरिब लाभार्थ्यांना घरकुलांपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवून निलंबित करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केली आहे.असा वळवला निधी़़़ शिरुर तालुक्यातील रायमोहा या गावासाठी मूलभूत सुविधेअंतर्गत २५ लाख रुपये आले होते. हा निधी शौचालयासाठी दिला. त्यानंतर रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २५ लाख रुपये आले होते. तो निधी मूलभूत सुविधेसाठी दाखविण्यात आला. त्यानंतर इंदिरा आवास योजनेसाठी आलेले ३२ लाख देखील शौचालयासाठी वळविण्यात आले अशी सूत्रांची माहिती आहे.
घरकुलांचा निधी शौचालयासाठी!
By admin | Updated: July 12, 2014 01:13 IST