कळंब : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावांगावात जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. या कामासाठी कळंब तालुक्यातील सहा गावांनी लोकवर्गणी जमा केल्यानंतर या गावांना प्रत्येकी अडीच लाख रुपयाप्रमाणे १३ लाखांचा निधी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार फंडातून दिला आहे. जलसंधारणाच्या कामातून निर्माण होणाऱ्या स्त्रोताबद्दल स्थानिकांना आत्मियता रहावी, यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले होते. या आवाहनानंतर कळंब तालुक्यातील शिराढोण, वडगाव सि; निपाणी, नायगाव, वाठवडा, पाडोळी या गावांनी लोकवर्गणी जमा केली. त्यामुळे आ. पाटील यांनी त्यांच्या फंडातून या गावाला जलसंधारणाच्या कामासाठी प्रत्येकी अडीच लाखाचा निधी दिला आहे. या गावाबरोबरच कळंब तालुक्यातील मस्सा, ईटकूर, मोहा, खामसवाडी या गावानींही लोकवर्गणीसाठी पुढाकार घेतला असून, या गावातील कामांसाठी खाजगी क्षेत्रातून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. दरम्यान कळंब तालुक्यात जलयुक्तमधून यंत्रणा स्तरावर मोठी कामे सुरू असतानाच तालुक्यातील २२ गावातील ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून, या गावातही लोकवर्गणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राप्त होणाऱ्या रकमेतून खोलीकरण, रुंदिकरण व सरळीकरणाची कामे करण्यात येणार असून, काही गावात नद्यातील गाळही लोकसहभागातून काढण्यात येणार आहे. यासाठी मस्सा व गोविंदपूर या गावात जलसंपदा विभागाची यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे इंधन व वाहतूक खर्च लोकसहभागातून भागविण्यात येत आहे. मस्सा येथे ३ तर गोविंदपूर येथे दोन कामे पूर्णत्वास आली असून, या दोन्ही ठिकाणी आणखी चार कामे प्रगतीपथावर आहेत. (प्रतिनिधी)
सहा गावांना आमदार फंडातून निधी
By admin | Updated: April 24, 2015 00:36 IST