जालना : विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजना सुरू केली आहे. मात्र, शासनाने यासाठी जमिनीचे दर कमी आकरलेले आहेत. जमीन वाटपामध्ये दारिद्र्यरेषेची अट शिथील करावी, दलित अन्याय अत्याचार विरोधी कायदा व अॅट्रासिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, गायरान जमिनींचा मुद्दा निकाली काढावा, नियमित केलेल्या अतिक्रमणधारकांना सातबारा देण्यात यावा, रमाई घरकूल योजनेचा प्रश्न मार्गी लावावा, रमाई घरकुलासाठी मालमत्ता पत्रकाची अट रद्द करावी, शहरी व ग्रामीण भागातील रोजंदारी कामगारांना संरक्षण द्यावे, अशा कामगारांना ६ हजार रूपये भत्ता देण्यात यावा, दुष्काळामध्ये शेतकरी व शेत मजुरांना अर्थ सहाय्य करावे, त्यांना काम देण्यात यावे, दलित व बौद्ध वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आदी १७ विविध मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अॅड. लक्ष्मण बनसोड, दिगंबर गायकवाड, सतीश वाहुळे, सुधाकर रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, बबन रत्नपारखे, एन. डी. गायकवाड, मधुकर बोबडे, संगीता अंभोरे यांच्यासह शेकडो पुरूष व महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
रिपब्लिकन पार्टीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: December 23, 2015 23:43 IST