सौहार्दता, एकात्मतेचा संदेश देणारा सिल्लोड शहरातील मजिदीसमोरील शिवाजी महाराजांचा पुतळा
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : अलीकडच्या काळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मतदारांना जाती-जातीत वाटून त्यांची मते मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार घ़डत आहे. मात्र, त्याला सिल्लोड सोयगाव तालुका अपवाद असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. महापुरुषांनाही जाती धर्माच्या कुंपणात बंदिस्त करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न होताना दिसून येतात. परंतु, सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यालगत असलेली मस्जिद सर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरावी, बहुधा महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सिल्लोड हे औरंगाबाद-जळगाव मार्गावरील ग्रामपंचायत असलेले एक छोटेसे खेडेगाव होते. गावात एकमेव रस्ता. रस्त्यावर टपऱ्यावजा चार- दोन हॉटेल्स होत्या. जुन्या भाजी मंडईजवळ बस थांबा होता. बाजूला जामा मस्जिद. गावात एक-दोन सरकारी कार्यालये जसे : शासकीय विश्रामगृह, सरकारी दवाखाना (गोल दवाखाना) हे सर्व जंगलात असल्यासारखे वाटत होते. सण १९६५ मध्ये ग्रामपंचायतीने गावात छत्रपतींचा पुतळा बसविण्याचा ठराव पारित केला. जामा मस्जिद जवळच निवडली. मस्जिद जवळशेजारीच गढी. गढीवर देशमुख मुस्लिमांची घरे खरे तर हवेल्याच त्या सिल्लोडला आज जो गजबजलेला मार्केटचा भाग झाला आहे.
त्यावेळी गाव वेशीच्या आतच होते. शिल्पकार रामचंद्र बंडू सासमकर यांनी मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया जवळ असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याची पाहणी केली. त्याच धर्तीवर सिल्लोड शहरात पुतळा बसविण्याचे ठरले. नियोजित पुतळ्याच्या जागेपासून सुमारे १००-१५० फुटांवर मस्जिद होती. खरे तर अशा ठिकाणी पुतळ्याची उभारणी करणे जिकिरीचे काम होते. परंतु ‘हिंदू मुस्लिम भाई भाई’ या न्यायाने पुतळा बसविण्याचे निश्चित झाले.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन सरपंच बदलले. त्यामुळे पुतळ्याचे काम काही काळ रेंगाळले. प्रत्यक्ष पुतळा बसविला तो तब्बल पुढे सात वर्षांनी म्हणजे १९७२ साली. त्यानंतर अलीकडच्या काळात मस्जिदचेही नूतनीकरण करण्यात आले. आजमितीला मस्जिद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे धार्मिक सौहार्दता आणि एकात्मतेची साक्ष देत आहेत. पुतळा आणि मस्जिद या कारणावरून शहरात गेल्या पन्नास वर्षांत धार्मिक तेढ निर्माण होईल अशी एकही घटना घडलेली नाही. हे सुसंस्कृत समाजमनाचे लक्षण म्हणावे लागेल.
शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहरात हे घडवून आणले आहे. आता अजिंठा लेणीत शिव पार्क उभारण्याचा त्यांचा मानस आहे. शिवजयंतीनिमित्त शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित, कम्युनिस्ट पक्ष या व्यतिरिक्त हिंदू-मुस्लिम व सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात, तर मुस्लिम बांधव मस्जितमध्ये जाऊन नमाज पडतात. सिल्लोडमध्ये तर आता बहुतेक मुस्लिमांनी भगवा हातात घेतला आहे. त्यामुळे सण उत्सव काळात पोलीस प्रशासनाचा ताणच मिटला आहे. सिल्लोड शहरातील मस्जिद समोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जाती-पातीचे राजकारण करणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत अंजन घालताना दिसत आहे.
फोटो कॅप्शन : सिल्लोड येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा...समोर मस्जित दिसत आहे.