नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उद्घाटन २१ आॅगस्ट रोजी होणार आहे़ तब्बल १४ मॉड्यूलर शस्त्रक्रिया विभाग असलेले राज्यातील हे एकमेव रुग्णालय राहणार आहे़ त्याबरोबर आगामी ५० वर्षातील लोकसंख्या विचारात घेता प्रत्येक विभागाची नियोजनबद्द आखणी केलेली आहे़ त्यामुळे नांदेडसाठी आता सुपर स्पेशालिटीचा मार्ग मोकळा झाला आहे़विष्णूपुरी येथे १२५ एकर जमिनीवर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची दिवंगत शंकरराव चव्हाण यांची संकल्पना होती़ फेब्रुवारी २००२ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या संदर्भात कार्यवाहीचे आदेश दिले होते़ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने भारतीय आर्युविज्ञान परिषदेने दोन टप्प्यात स्थलांतरणाला मान्यता दिली़ त्यात पहिल्या टप्प्यातील १४० कोटी रुपयांचे कामे पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील ७८ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली आहे़ ७५० खाटांच्या या रुग्णालयामध्ये जवळपास आठ इमारती एकमेकांशी संलग्नित आहेत़ १४ मॉड्यूलर शस्त्रक्रिया विभाग आजघडीला राज्यातील कोणत्याच रुग्णालयात नाहीत़ तसेच याच ठिकाणी १०० निवासी डॉक्टरांचे वसतीगृह देखील आहे़ त्यामुळे वैद्यकीय सेवेमध्ये विलंब होणार नाही़ त्याचबरोबर जळीत कक्ष, सीटी स्कॅन, एमआरआय, मध्यवर्ती आॅक्सिजन पुरवठा, मध्यवर्ती सक्शन व्यवस्था, भविष्यात सर्व रुग्णालये संगणीकृत करण्याच्या दृष्टीने एच़एम़आय़एस़प्रणाली सुरु करण्यात येणार आहे़ येत्या काळात वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १५० होईल त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे़ रुग्णालय संकुलामध्ये २५० आसनक्षमतेचे वातानुकुलित सभागृह निर्माण करण्यात आले आहे़ दुसऱ्या टप्यातील विविध वसतिगृहे, मुख्य प्रशासकीय भवन, निवासी डॉक्टरांचे वसतिगृह, ग्रंथालय इमारत आदी इमारतीचे बांधकामे सुरु आहेत़ विष्णूपुरी येथील सुसज्ज बांधकामामुळे दंत महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी, कर्करोग रुग्णालय, पॅरामेडीकल संस्था, योगा रिसर्च सेंटर आदींचा मार्ग मोकळा झाला आहे़ याचा लाभ रुग्णांना होणार आहे़डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सेफ सिटी, पश्चिम वळण रस्ता व जिल्हा उद्योग भवन या जवळपास २०० कोटी रुपयांच्या कामांचे २१ आॅगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे़ कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुपर स्पेशालिटीचा मार्ग मोकळा
By admin | Updated: August 20, 2014 00:19 IST