हिंगोली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक बारावीच्या विद्यार्थ्यांना एमएच-सीईटीसंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील तरुण डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांना भेटी देऊन क्रॅश कोर्सचे आयोजन केले जात आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे वर्ग मोफत घेण्यात येणार आहेत. आजघडीला दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने, अनेकांपुढे शिक्षणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे खाजगी शिकवणी लावणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. परंतु काही दानशूर व्यक्तीही दुष्काळातून त्यांना सावरण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. दरम्यान, डॉ. शुभम होकर्णे यांनी विविध डॉक्टरांच्या साह्याने १२ वीच्या गरजू व होतकरु विद्यार्थ्यांसाठी हिंगोली शहरात ४५ दिवसीय मोफत सीईटी वर्गाचे आयोजन केले आहे. यासाठी राजे संभाजी महाविद्यालयात १५ मार्च रोजी सीईटीसाठी प्रवेश परीक्षा घेऊन १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १६ मार्च पासून वर्ग घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी डॉ. विष्णु नागुलकर, हर्षल बासटवार, कृष्णा किल्लेवाड, बालाजी लांडगे, नागेश जाधव, ज्ञानेश्वर राठोड सोमेश बाजोडे हे सहकार्य करणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय सीईटीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोफत वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. शुभम होकर्णे यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्याच्या आरोग्यक्षेत्रातील प्रगतीसाठी प्रयत्न करणार असून, सामाजिक हितासाठी व दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांची सीईटीची तयारी मोफत करुन घेणार आहोत, असे मुख्य संयोजक डॉ. शुभम होकर्णे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सीईटीसाठी मोफत प्रशिक्षण
By admin | Updated: March 14, 2016 00:29 IST