लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : तालुक्यातील ममदापूर शिवारात बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुरुवारी सकाळी १० वाजता ममदापूर शिवारातील सुभाष कानडे व निजाम पटेल यांच्या उसामध्ये हा बिबट्या जात असताना येथील पप्पू कानडे, अफसर शेख, शिवाजी बागूल यांनी जवळून पाहिल्यावर त्याला पिटाळून लावण्यासाठी त्याठिकाणी फटाके वाजविले. यानंतर हा बिबट्या उसाच्या क्षेत्रातून ममदापूर शिवारात घुसला.दोन दिवसापूर्वी गोदा काठावरील नेवरगाव शिवारात हाच बिबट्या आढळून आला होता. येथील एका तरुणाने दूरवरून जात असलेल्या या बिबट्याचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपला होता. त्यानंतर हा बिबट्या कानडगाव, ममदापूरमार्गे बगडी शिवारात आला आहे. सायंकाळी ६.३० वाजता सदर बिबट्या बगडी शिवारातील फिल्टर प्लांटजवळील माजी सरपंच कैलास बोडखे यांच्या शेतात कपाशीमध्ये दिसून आला. या ठिकाणाहून बिबट्याला पिटाळण्यासाठी नागरिक जमा झाले आहेत. बिबट्याच्या वास्तव्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या ५ वर्षात गंगापूर तालुक्यातील जामगाव शिवारात आतापर्यंत ३ ते ४ बिबट्यांना वनविभागाने पिंजरे लावून पकडले आहे. गोदावरी नदीकाठी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र त्याचप्रमाणे वेड्या बाभळीचे जंगल असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा आहे. या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
ममदापूर, बगडी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:16 IST