बीड : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्यायपुस्तिका मिळणार आहेत. १५ जून हा बुक डे म्हणून साजरा होणार आहे. याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.२०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ होणार आहे. जि.प. शाळा, अनुदानीत खासगी शाळांमधील ३ लाख ९४ हजार ८९४ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ होणार आहे. प्राथमिक (१ ते ५) पर्यंतच्या २ लाख ४९ हजार ८१५ तर उच्च प्राथमिक (६ ते ८) १ लाख ४५ हजार ७९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १५ जून रोजी नव्या शैक्षणिक सत्रास प्रारंभ होणार आहे. पहिल्याच दिवशी बुक डे साजरा होणार असून समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली जाणार आहेत. दरम्यान, शाळा उघड्याआधीच औरंगाबाद येथील विभागीय पाठ्यपुस्तके भांडार येथून तालुकास्तरावर पुस्तके व स्वाध्यायपुस्तिका प्राप्त झाल्या आहेत. मोफत पुस्तकांपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांनी दिली. आष्टी, पाटोदा, शिरुर वगळता इतर तालुक्यांत पुस्तके आली आहेत. या तीन तालुक्यांनाही लवकरच पुस्तके उपलब्ध होतील असे सानप म्हणाले.आॅनलाईन नोंदपुस्तके वाटपात अनियमितता होऊ नये यासाठी यावर्षी पहिल्यांदाच मंजूर व वाटप पुस्तकांच्या आॅनलाईन नोंदी करावायाच्या आहेत. शाळेचा यूडायएस कोड क्रमांक, विद्यार्थी संख्या, प्राप्त पुस्तके, वाटप पुस्तकांच्या नोंदी घेतल्या जातील. (प्रतिनिधी)
३ लाख ९४ हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2015 00:34 IST