अंबड : जालना-वडीगोद्री मार्गाचे चौपदरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे केली.अंबड येथील नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अंबड शहर व तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी आपण सरकारी बजेटमधून उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.भाजपा प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खा. दानवे यांचा चक्री चौक येथे नागरी सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, आ. नारायण कुचे, माजी आ.शिवाजी चोथे, माजी आ. विलास खरात, तालुकाध्यक्ष अवधूत खडके, जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, साहेबराव खरात, बबन बुंदेलखंडे, शहराध्यक्ष रमेश शहाणे, देविदास कुचे, अंबादास अंभोरे, किरण खरात, औदुंबर बागडे, प्रसाद झाडे, नारायण कोळपे, सुभाष देंडगे आदींची उपस्थिती होती. खा.दानवे म्हणाले की, आपण ३५ वर्षांच्या पक्षसेवेनंतर या पदापर्यंत पोहचू शकलो. आपल्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आपला कोणताही नातेवाईक राजकारणात नव्हता. तरीही आपणाला केवळ पक्षनिष्ठा व जनसेवेच्या बळावरच ग्रामपंचायत सदस्यापासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत प्रवास करता आला. एका सामान्य कार्यकर्त्याचा असा प्रवास केवळ भाजपामध्येच शक्य आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सतत कार्यरत आहोत. अंबड-पाचोड रस्त्यासाठी केंद्राच्या निधीतून १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच अंबड व घनसावंगी तालुक्यासाठी महत्वाचा असलेल्या जालना-वडीगोद्री या मार्गाचे चौपदरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा खा.दानवे यांनी केली. प्रास्ताविकात अवधूत खडके यांनी खा. दानवे यांच्याकडे अंबड तालुक्यात विविध विकास योजना राबविण्याची मागणी केली. माजी आ.शिवाजीराव चोथे यांनी आपल्या भाषणात जालना-वडीगोद्री चौपदरीकरण मागणीचा पुनरूच्चार केला. हा धागा पकडून प्रदेशाध्यक्ष खा.दानवे म्हणाले की, अभी मेरे पास अलाद्दीन का चिराग है, जितना मांगो मिलेगा. (वार्ताहर)
जालना-वडीगोद्री मार्गाचे लवकरच चौपदरीकरण - दानवे
By admin | Updated: January 30, 2016 00:21 IST