परभणी: येथील महानगरपालिकेतील १४ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या एका आदेशान्वये बदल्या करण्यात आल्या. महत्त्वाच्या विभागातील नागरिकांशी संबंधित कामे करण्यास विलंब लागत असल्याने ओरड वाढली होती. या वर उपाययोजना म्हणून या बदल्या झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहर महानगरपालिकेत फेरफार, बांधकाम परवाना देण्याबरोबरच नळ जोडणी देणे, शहरातील स्वच्छता ही कामे थेट नागरिकांशी संबंधित आहेत. परंतु सहा-सहा महिन्यांपासून कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनीही या संदर्भात ओरड केली होती. त्यामुळे महापौर प्रताप देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन या सर्व बाबींमध्ये सुसुत्रता आणण्याचा निर्णय घेतला. शहरातील नागरिकांना फेरफार व बांधकाम परवाना जास्तीत जास्त वीस दिवस ते एक महिन्यात मिळणे अपेक्षित असते. परंतु तीन महिने, सहा महिने ते वर्षभरापर्यंतही हे परवाने मिळण्यास विलंब लागत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही फेरफार, बांधकाम परवानगी मिळण्यास विलंब लागल्याचे समोर येत आहे. नागरिक चकरा मारतात, काम होत नाही. त्यानंतर नगरसेवक किंवा महापौरांकडे संपर्क साधतात. याउपरही दखल घेतली जात नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बदल्या झाल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.या बैठकीस मनपाचे विरोधी पक्ष नेते भगवानराव वाघमारे, गटनेते अतूल सरोदे, आयुक्त अभय महाजन, उपायुक्त रणजीत पाटील, दीपक पुजारी आदींची उपस्थिती होती.या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या विरोधी पक्ष नेते यांचे स्वीय सहायक राजाभाऊ कामखेडे यांची बदली हस्तांतर विभागात, संकीर्ण विभागातील बाबर खान हमीद खान यांची हस्तांतरण विभागात, शिक्षण विभागातील लिपीक आशा विडोळकर यांची आवक जावक विभागात, कर विभागातील रफीक अहमद गुलाम दस्तगीर यांची बिल विभागात, बांधकाम विभागातील संगणक चालक बी.ए. गाडगे यांची पाणीपुरवठा व बांधकाम विभागात संगणक चालक म्हणून, शिक्षण विभागातील विद्या पिंपळगावकर यांची अस्थापना विभागात, मालमत्ता विभागातील बिल कलेक्टर कैलास ठाकूर यांची महापौर कक्षात, हस्तांतरण विभागातील लिपीक मुक्तसीद खान यांची प्रभाग समिती क मध्ये, रेकॉर्ड विभागातील लिपीक ए.बी. मोरे यांची रेकॉर्ड विभाग प्रमुख म्हणून, बांधकाम विभागातील संगणक चालक राजभाऊ मोरे यांची पेन्शन लिपीक म्हणून, प्रभाग समिती क मधील एसानुल हक कादरी यांची संगणक विभागात, प्रभाग समिती अ मधील लिपीक प्रकाश कुलकर्णी यांची प्रभाग समिती क मध्येच शाकेर अली यांच्या ठिकाणी, प्रभाग समिती क चे प्रमुख शाकेर अली यांची प्रभाग समिती ब चे प्रमुख म्हणून, मालमत्ता विभागातील श्रीपाद कुलकर्णी यांची कर अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)स्वच्छता विभागातही बदलाचे संकेतस्वच्छतेविषयीही नागरिकांची नाराजी आहे. स्वच्छता कामगारांची हजेरी झाल्यानंतरही वेळेवर काम होत नाही. स्वच्छता निरीक्षकांची कामगारांवर पकड नाही, अशी चर्चा या बैठकीत झाली. त्यावर काही स्वच्छता निरीक्षक कमी करुन त्या जागी नव्याने नियुक्त्या करण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी नेमावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
चौदा अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: August 10, 2014 23:51 IST