हिंगोली : जिल्ह्यातील दहा तीर्थक्षेत्रांना मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी चार हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आहेत. आणखी आठचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.जिल्हा नियोजन समितीच्या १३ जुलैच्या बैठकीत ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव ठेवले होते. त्यापैकी परिपूर्ण अशा दहा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात हिंगोली मतदारसंघातील ४ प्रस्ताव मंजूर झाले. त्यात श्रीराम मंदिर खांबाळा, महादेव संस्थान वैजापूर, जागृत हनुमान मंदिर माळहिवरा, श्री १00८ संभवनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पुसेगावचा समावेश आहे. यासाठी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी प्रयत्न चालविले होते.त्याचबरोबर नव्याने एकूण १४ प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी दिली. त्यात हिंगोली मतदारसंघातील आठ प्रस्ताव सादर करण्याची शिफारस करून तशा सूचना जि. प. ला या बैठकीत आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दिल्या. यात कानिफनाथ संस्थान सिंदेफळ, माणकेश्वर संस्थान पानकनेरगाव, विठ्ठल मंदिर देवस्थान केंद्रा बु., येडोबा म.संस्थान बाभूळगाव, नीळकंठ खोरेश्वर महादेव संस्थान कडती, महादेव मंदिर सिनगी खांबा, भगवती देवी संस्थान भगवती यांचा समावेश आहे. हे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया जि. प. ने सुरू केली आहे. हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या संस्थानाच्या विकासासाठी निधी मिळवून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे हे प्रस्ताव परिपूर्ण व वेळेत मार्गी लावण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे आ. गोरेगावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चार तीर्थक्षेत्रांना मंजुरी; आणखी आठ प्रस्ताव
By admin | Updated: September 7, 2014 00:27 IST