अनाळा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु) येथे वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुमारे चार लाख रूपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या पथकाने प्रारंभी चिंचपूर (बु) येथील पोपट शिंदे याच्या घर, ढाब्यावर छापा टाकला. या ठिकाणाहून काही बाटल्या जप्त केल्यानंतर या पथकाला गावात असलेल्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यातही दारू ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. यावरुन पथकाने तेथेही छापा टाकला असता तेथेही दारू आढळली. यानंतर पथकाने शिंदे याच्या घराच्या पाठिमागील बाजूस असलेल्या मोबाईल टॉवरच्या बॅटरी स्टोअर रूममध्येही दारू ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. यावरून हे पथक तेथे गेले. यावेळी ही खोली कुलूपबंद होती. पथकाने या खोलीचे कुलूप तोडले असता आतही मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला. पथकाने ही सर्व दारू जप्त करून सुरेश कांबळे याला अटक केली. तर महादेव दत्तू शिंदे आणि पोपट दत्तू शिंदे हे दोघे फरार आहेत. कारवाईत जप्त केलेला हा माल सुमारे चार लाख रूपय ेकिंमतीचा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीकर यांनी दिली. ही करवाई अधीक्षक श्रीकर यांच्यासह निरीक्षक जगदाळे, पी. जी. कदम, एस. आर. राठोड, जी. बी. इंगळे, जवान आळनारकर, शिंदे, हजारे, चव्हाण, बुदागे, भंडारी, राजधने, डोंबाळे, चालक ए. आर. शेख, कडणीस, ज्योतीराम शिंदे यांच्या पथकाने केली. याबाबतची कायदेशीर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)
चार लाखांची दारू जप्त
By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST