औरंगाबाद : मनपा निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांच्या गलथानपणाचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. चिन्ह वाटपाच्या दिवशी एका उमेदवाराला खुर्ची हे चिन्हा बहाल करण्यात आले. खुर्ची घेऊन उमेदवाराने प्रचारही सुरू केला. मात्र, खुर्ची हे चिन्ह निवडणूक विभागाच्या यादीतच नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. मग काय त्या बिचाऱ्या अपक्ष महिला उमेदवाराची खुर्ची हिसकावून घेत त्याला गॅस सिलिंडर हे चिन्ह बहाल करण्यात आले. चार दिवस खुर्ची... खुर्ची... असा प्रचार केल्यानंतर आता सिलिंडर घेऊन पहिल्यापासून सुरूवात करावी लागणार असल्याने या उमेदवार हैराण झाल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या गलथान कारभाराविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय अखेर या उमेदवाराने घेतला आहे. ज्योत्स्ना भारत इंगोले असे या उमेदवाराचे नाव आहे. इंगोले यांनी वॉर्ड क्रमांक १०१ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. ११ एप्रिल रोजी चिन्ह वाटपाच्या दिवशी त्यांना निवडणूक विभागाने खुर्ची हे चिन्ह बहाल केले. हे चिन्ह घेऊन इंगोले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वॉर्डात जोरदार प्रचार सुरू केला. बुधवारी (दि. १५) निवडणूक विभागाचे दोन कर्मचारी एक पत्र घेऊन इंगोले यांच्याकडे आले. पत्रातील मजकूर पाहून इंगोले यांना धक्काच बसला. कारण त्यात तुमचे निवडणूक चिन्ह खुर्ची नसून गॅस सिलिंडर असल्याचे म्हटले होते. चिन्ह बदलल्याचे पत्र आपल्याला जरी निवडणूक कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिले असले तरी त्यावर चार दिवस अगोदरची म्हणजेच ११ एप्रिल अशी तारीख असल्याचे उमेदवाराचे म्हणणे आहे. निवडणूक विभागाने आपली फसवणूक केली असून अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी इंगोले यांनी केली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रारही इंगोले यांनी दिली आहे.
चार दिवसांनंतर हिसकावली उमेदवाराची खुर्ची!
By admin | Updated: April 16, 2015 01:01 IST