लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई शहर पोलिसांनी कारवाई करत घातक शस्त्रास्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असणा-या चौघांच्या मुसक्या आवळल्या. तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजता घडली.अंबाजोगाई लगतच्या पोखरी रोडवर किशोर परदेशी यांच्या शेडच्या बाजूला आडोशाला पाच ते सहा लोक हातात लोखंडी रॉड, पाईप, अँगल घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीने दबा धरुन बसले असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांना मिळाली होती. या महितीची तातडीने दखल घेत गिते यांनी सहा.पो.नि. तडसे, जमादार नागरगोजे, कुंडगिर, सोडगीर, देशमाने कांबळे यांना सोबत घेत पोखरी रोडकडे धाव घेतली. परदेशी यांच्या शेडजवळ पोलीस वाहन उभे करून सर्वजण पुढे निघाले असता त्यांना झुडपात पाच ते सहा व्यक्ती हातात लोखंडी रॉड, पाईप, अँगल घेऊन दबा धरून बसलेले आढळून आले. पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून राजेंद्र श्रीराम कळसे, महादेव बालासाहेब धारमोडे, गोविंद नामदेव आलगुंडे आणि रामभाऊ गोरखनाथ मुद्दे (सर्व रा. अंबाजोगाई) यांना पकडले तर जीवन प्रभाकर सोळंके हा अंधाराचा फायदा घेऊन झुडपातून पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या चौघांकडून पोलिसांनी शस्त्रात्रे आणि मिर्ची पावडर जप्त केली आहे. याप्रकरणी पो.ना. बाबुराव सोडगीर यांच्या फियार्दीवरून पाचही आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. चौकशीतून अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
दरोड्याच्या तयारीतील चौघे शस्त्रांसह जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:49 IST