लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवाळीनिमित्त येथील आझाद मैदान आणि जुन्या जालन्यातील नगरपालिका क्रीडा मैदानावर फटाका विक्रीची १३० दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र, नगरपालिकेच्या क्रीडा मैदानावरील ४० फटाका स्टॉल्सधारकांनी आवश्यक परवानगी न घेतल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील वर्षी औरंगाबाद येथील फटाका मार्केटला भीषण आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच ठिकाणी फटाका विक्रीची दुकाने थाटणा-यांना आवश्यक परवानग्या व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात फटाका स्टॉल्सधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे.येथील आझाद मैदानावर फटाका विक्रीची ७० दुकाने थाटली आहेत. प्रत्येक दुकानामध्ये दहा फुटांचे अंतर असणे आवश्यक असताना या नियमाचे पालन करण्यात आलेले नाही. आज उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, नगरपालिकचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, पोलीस निरीक्षक महादेव राऊत, नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांनी फटाका बाजारात जाऊन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींची पाहणी केली. त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे अधिका-यांनी सर्व फटाका स्टॉल्सधारकांना एकत्र बोलावून अग्निशमन यंत्र, फटाका दुकानासमोर पाण्याचा ड्रम, प्रत्येक दुकानामध्ये विशिष्ट अंतर ठेवण्याबाबत सूचना केल्या.नवीन फटाका विक्री दुकानासाठी परवानगी घेताना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. ज्या विक्रेत्यांनी परवाना नूतनीकरण केले नाही, त्यांनी दोन दिवसांत नूतनीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दिवाळी जवळ येत असल्यामुळे फटाका मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक सर्व उपाययोजना दोन दिवसांत करण्याचे निर्देश अधिका-यांनी फटाका विक्रेत्यांना दिले. दरम्यान, जुना जालन्यातील नगरपालिका क्रीडा संकुलात थाटण्यात आलेल्या चाळीस फटाका स्टॉल्सधारकांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
चाळीस फटाके दुकाने विनापरवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:15 IST