औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन संचलित जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २२ विद्यार्थ्यांच्या संघाने ‘वायू ए. ओ.’ ही फॉर्म्युला कार तयार केली आहे. दिल्ली येथील बहुप्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘सुप्रा एस. ए. ई- २०१६’ या स्पर्धेसाठी ही कार आता पाठविली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.विशेष म्हणजे या कारचे डिझाईन या विद्यार्थ्यांनीच तयार केले आहे. महाविद्यालयाच्या कार्यशाळेतच कित्येक महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही कार मूर्त स्वरुपात उभी केली. केटीएम-३९० या विख्यात मोटारसायकलचे इंजिन कारला बसविण्यात आले आहे. पुश रॉड प्रकारातील सस्पेंशन बसविण्यात आले असून ते खास तैवानहून मागविण्यात आले आहे. प्रो-ई सॉफ्टवेअर वापरून तयार करण्यात आलेल्या या कारचे स्टेअरिंग ‘रॅक अँड पिनियन’ प्रकारातील आहे. चालवीत असताना ड्रायव्हरची सुरक्षितता पुरेपूर लक्षात घेऊन या कारचे मॉडेल बनविण्यात आले आहे. ड्रायव्हर्स सेफ्टी ही या कारची विशेषता आहे. यामध्ये ‘थ्री लेयर फायर रेझिस्टन्स’ बसविण्यात आले असून, तेही परदेशातून आयात करण्यात आले. ड्रायव्हरसाठी ड्रायव्हर सूट, शूज, ग्लोव्हज, स्नेल रेटेड, हेल्मेट आदी गोष्टीही तयार केल्या आहेत. प्रा. सुदर्शन धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही कार तयार केली आहे. प्रा. डी. एस. दाभाडे, संजय भाजीपाले आदींचेही याकामी सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, एमजीएमचे विश्वस्त प्रताप बोराडे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विभागप्रमुख डॉ. एम. एस. कदम आदींनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थी मित्रांनो तुम्हीही असे काही नवीन प्रयोग, यंत्र तयार केले असतील, तर तुमच्या या प्रयोगांचे स्वागतच आहे. तुमच्या नवनवीन प्रयोगांना या सदरातून प्रसिद्धी दिली जाईल. यासाठी लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे संपर्क साधावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाची असणारी ही कार स्पर्धेत नक्कीच यश मिळवील, असा विश्वास आमच्या संपूर्ण टीमला वाटतो. - प्रा. सुदर्शन धारूरकर
विद्यार्थ्यांनी बनविली फॉर्म्युला कार
By admin | Updated: July 6, 2016 00:16 IST