ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २४ - जिह्यातील काँग्रेसचे नेते, उदगीरचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भोसले यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ५५ वर्षाचे होते.
मंगळवारी पहाटे उदगीर येथील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उदगीर येथील लाईफ केअर हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रशेखर भोसले हे जवळपास तीन वेळा उदगीर नगर पालिकेचे नगरसेवक, बाजार समितीचे संचालक आणि २००४ ते २००९ पर्यंत उदगीर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ते काँग्रेसमध्ये आले होते. सध्या ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परीवार आहे. चंद्रशेखर भोसले यांच्या निधनामुळे उदगीरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर आज दुपारी चार वाजता उदगीरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.