माजी न्यायाधीश कर्नान यांना चेन्नईत अटक
----------------------
न्यायाधीश, पत्नींवर आक्षेपार्ह वक्तव्ये
चेन्नई : उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्नान यांना बुधवारी चेन्नई पोलिसांनी अटक केली. महिला न्यायाधीश आणि न्यायाधीशांच्या पत्नींबद्दल कर्नान यांनी आक्षेपार्ह भाष्ये करून ती युट्यूबवर पोस्ट केली.
कर्नान यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, न्यायमूर्तींच्या पत्नींवर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह भाष्ये करून ती ऑनलाईन अपलोड केली, असा आरोप आहे. या प्रकरणी कारवाई करत नसल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच पोलिसांवर कठोर ताशेरे ओढले होते. २०१७ मध्ये कर्नान हे तुरूंगवासाची शिक्षा सुनावले गेलेले पहिले उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश ठरले होते. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कर्नान यांना ते कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना सहा महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा झाली होती.
--------------------