वाळूज महानगर : जि. प.चे शिवसेनेचे माजी सभापती तथा वाळूजचे विद्यमान उपसरपंच मनोज जैस्वाल व एका ग्रामपंचायत सदस्याच्या भाच्यात फ्री-स्टाईल हाणामारीची घटना गुरुवारी दुपारी वाळूजच्या लांझी चौकात घडली. नुकतीच सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना शहरातही घडली होती.गुरुवारी दुपारी मनोज जैस्वाल हे लांझी टी पॉइंटवरून घराकडे जात असताना सोन्या ऊर्फ प्रशांत चौरे (२२ रा. हनुमंतगाव, ता. गंगापूर) याने अडवून अचानक जैस्वाल यांच्यावर हल्ला चढविला. अनपेक्षितरीत्या घडलेल्या या प्रकारामुळे मनोज जैस्वाल गोंधळले. यानंतर दोघांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी सुरूअसताना प्रत्यक्षदर्शीने दोघांना बाजूला केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. बघ्यांची मोठी गर्दी तेथे जमली. यानंतर जैस्वाल यांनी वाळूज पोलीस ठाण्यात जाऊन उपायुक्त वसंत परदेशी, निरीक्षक धनंजय येरुळे यांना माहिती दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली असून पुढील चौकशी सहायक फौजदार दत्तात्रय साठे करीत आहेत. सरपंच सुभाष तुपे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काकासाहेब चापे पाटील, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत, अनिल साळवे, अनिल तुपे, संतोष धुमाळ आदींनी जैस्वाल यांची भेट घेतली. हे सर्वजण जैस्वाल यांचे समर्थक समजले जातात. लागोपाठ दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्यामुळे चर्चा होत आहे.
सेनेच्या माजी सभापतीला मारहाण
By admin | Updated: July 29, 2016 01:08 IST