सतीश जोशी, परभणीकेंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे नेते गोपीनाथ मुंंडे यांच्या जाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारणालाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याचे राजकारण बदलण्याची चिन्हे दिसत होती, तशा हालचालीही सुरू झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांची जरी वंजारी समाजाचे दैवत म्हणून ओळख असली तरी मुंडे यांचा आपल्या समाजाप्रमाणेच इतर जातीधर्मावरही चांगला प्रभाव होता. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यात वंजारी समाजाप्रमाणे ओबीसी मतदारांचाही प्रभाव आहे. निवडणूक विधानसभा, लोकसभेची असो की नगर परिषद, जिल्हा परिषदेची. मुंडे यांच्या एका सभेमुळे वातावरण बदलत असे. हा मतदार भाजपा-शिवसेना महायुतीकडे वळविताना त्यांनी जातपात, नात्यागोत्याच्या राजकारणालाही थारा दिला नव्हता. त्यांच्या समाजात तर मुंडे सांगतील हीच पूर्वदिशा असे. मुंडे यांनी परळीप्रमाणेच गंगाखेडलाही जीव लावलाच नाही तर या मतदार संघात भाजपाचे अस्तित्व जिवंत ठेवले. गंगाखेडमध्ये वंजारा समाजासोबत हटकर, धनगर समाजालाही बरोबरीने सोबत घेऊन भाजपा - शिवसनेची ताकद निर्माण केली होती. मुंडे यांनी गंगाखेड येथे तर ग्रामपंचायत निवडणुकीपासून पालिका, जि. प. आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची ताकद बाळगणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते तयार केले होते. आज या मंडळीचा आत्मविश्वास हा मुंडे यांच्या जाण्यामुळे डळमळीत झाला आहे. असाच प्रभाव त्यांचा जिंतूर तालुक्यातील वंजारी आणि ओबीसी समाजावर होता. जिंतूर मतदार संघात असलेली ही गठ्ठा मते तालुक्यातील निवडणुकीची दिशा बदलत होती. नुकत्याच झालेल्या परभणी लोकसभा निवडणुकीत जिंतूरचे काँग्रेसचे आ. रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडचे आ. सीताराम घनदाट, राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांनी उघडउघड शिवसेनेचे उमेदवार खा. बंडू जाधव यांचा प्रचार करून शिवसेनेच्या विजयास हातभार लावला होता. संपूर्ण भारतात जरी नरेंद्र मोदी यांची लाट होती तरी परभणी लोकसभा मतदार संघात या लाटेला गती देण्याचे काम निश्चितच या मंडळीनी केले. त्यांची ही कृती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणाला कदाचित वळण देणारीही ठरली असती. हे सर्व बदलते राजकारण गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना केंद्रबिंदू माणून वळणावर होते. लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने तर आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि गोपीनाथ मुंडे यांचा अनेकदा सुसंवादही झाला होता. या न त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांची जवळीक वाढत चालली होती. कारण जिंतूर विधानसभा मतदारसंघात असलेले वंजारा समाजाचे गठ्ठा मतदान मुंडे यांच्या आशीर्वादाने कॅश करण्याचा बोर्डीकर यांचा हा प्रयत्न होता. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या एकतर्फी यशामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेते मंडळीही विचलित झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे हे जिल्ह्यातील राजकारण बदलतील, अशी चिन्हे आणि चर्चा चालू असतानाच मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे या बदलत्या राजकारणाबद्दल प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.
मुंडे यांच्यावर विसंबून होते भावी राजकारण
By admin | Updated: June 6, 2014 01:02 IST