माजलगाव : एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत माजलगाव कृषी कार्यालयामार्फत केलेल्या बांधबंधिस्त कामात १,८०,१८१ रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. कृषी आयुक्तालयाच्या पथकाने केलेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाल्याने त्यांच्या आदेशावरून शुक्रवारी कृषी कार्यालयातील ५ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.२०१२ मध्ये तालुक्यातील मंगरूळ न. १ शिवारात १९ लाख २१ हजार रुपयाची बांध बंधीस्तीची ३५१ कामे मंजूर झाली होती. कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून कामे न करताच अहवाल पाठवून रकमेचा अपहार केला. याबाबत सावरगाव येथील राम जगताप यांनी लोक आयुक्तांकडे तक्रार केली. याची दखल घेत कृषी आयुक्त पुणे यांनी दक्षता पथक नेमले. चौकशीत ५४ कामे केलीच नसल्याचे आढळून आले तर, ११६ बांध हे कमी छेदाचे असल्याचे निदर्शनास आले. दक्षता पथकाने पाठविलेल्या अहवालावरून कृषी आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. (वार्ताहर)
पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा
By admin | Updated: December 30, 2016 22:20 IST