संतोष मगर । लोकमत न्यूज नेटवर्कतामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथील शेतकरी मारूती मगर यांनी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता गावच्या वाढीव वस्तीतील शाळेसाठी मोक्याच्या ठिकाणी असलेली पाच गुंठे जमीन दान दिली. या जागेवर शाळेची टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. एवढेच नाही, तर सात वर्षांपासून शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत पाणीपुरवठाही केला जात आहे. शेतकरी मगर यांच्या या दातृत्वाचे पालकांसह पसिरातील ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे दिवंगत विलासराव देशमुख यांच्या हाती असताना सांगवी काटी येथील वाढीव वस्तीत शाळेला मंजुरी देण्यात आली होती. काही वर्ष ही शाळा शिक्षकाच्या राहत्या घरामध्येच भरविली जात होती. कालांतराने वस्तीशाळेचे रूपांतर प्राथमिक शाळेत झाले. शाळेसाठी इमारत उभी करण्याकरिता निधीही मंजूर झाला. परंतु, इमारतीसाठी जागाच उपलब्ध नव्हती. जागा न मिळाल्यास निधी परत जाईल, असे वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आल्याची माहिती शेतकरी मारूती मगर यांना समजली. त्यावर त्यांनी शाळेच्या शिक्षकांसोबत चर्चा आणि कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वत:च्या मालकीची पाच गुंठे जमीन शाळेसाठी दान देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. जागेचा मोठा अडसर दूर झाल्यानंतर प्रशासनाकडूनही या जागेवर युद्धपातळीवर इमारत उभी केली. सध्या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे.विद्यार्थ्यांची पायपीट थांबलीमगर यांनी शाळेला जागा दिल्यानंतर तेथे शाळेसाठी इमारत उभी राहिली. नवीन इमारतीत शाळाही भरण्यास सुरूवात झाली. परंतु, तेथे विद्यार्थ्यांसाठी पाणी उपलब्ध नव्हते. हा प्रश्न लक्षात आल्यानंतर मगर यांनी शाळेसाठी मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. मगर यांच्या पुढाकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्यास मदत झाली आहे.
विनामोबदला शाळेसाठी दिली पाच गुंठे जमीन
By admin | Updated: May 9, 2017 23:47 IST