लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहरातील विविध भागातील ५ विद्युत रोहित्रावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने दगडफेक करून नासधूस केल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.शहरातील सटवाई माता मंदिर, उलट्या नदीवरील पूल, बंजारा कॉलनी, आदर्श कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या भागातील विद्युत रोहित्राची २० ते २५ जणांच्या टोळक्याने दगडफेक करून नासधूस केली. या घटनेमुळे काही वेळ या भागात तणावाची स्थिती होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या भागात धाव घेतली. तोपर्यंत हे टोळके निघून गेले होते. या प्रकारामुळे पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. तसेच चार तास वीज पुरवठा बंद राहिला. दगडफेक नेमकी का केली? याची माहिती मात्र कोणालाच नव्हती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. तर महावितरण कंपनीच्या वतीनेही याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली नव्हती. यामुळे नेमकी नासधूस का केली, याची माहिती मिळू शकली नाही.
जिंतुरात पाच विद्युत रोहित्रांवर दगडफेक
By admin | Updated: June 26, 2017 23:49 IST