मधुकर सिरसट , केज आशिया खंडातील सर्वात मोठे मत्स्य बीज केंद्र केज तालुक्यातील धनेगावला आहे़ मात्र, या मत्स्य बीजनिर्मिती केंद्राला मागील दहा वर्षांपासून घरघर लागली आहे़ ती काही थांबायचे नाव घेत नाही़ ५६ लाख रुपये खर्च करुनही या केंद्राची दुरवस्था संपायला तयारी नाही़ त्यामुळे मच्छीमारांचे संसार उघड्यावर आले आहेत़ १९८७- ८८ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने ५५ लाख ८४ हजार रुपये खर्च करुन मांजरा धरणाच्या पायथ्याला १६ हेक्टर क्षेत्रावर मत्स्य बीज निर्मिती केंद्र उघडण्यात आले़ हौद व इमारतीचे काम पूर्ण झाले असून मत्स्य बीज निर्मितीसाठी १०० नर्सरी, तळे व संचय तलाव उभारण्यात आले़ २००३ मध्ये हे केंद्र सुरु झाले; पण त्यानंतर या केंद्रात एकापाठोपाठ एक समस्या सुरु झाल्या़ मत्स्य बीज निर्मिती केंद्राला योग्य प्रमाणात गोड्या पाण्याची व्यवस्था झाली नाही, शिवाय पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली़ त्यामुळे हे केंद्र बंद पडले़ केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा मत्स्य बीज निर्मिती केंद्र पूर्ववत सुरु करण्यासाठी योग्य ते प्रयत्न सुरु आहेत़ येथे दुरवस्था असल्या तरी त्यात सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सुरेंद्र पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ ६ कोटी मत्स्यबीज निर्मिती मांजरा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मत्स्यबीज निर्मिती केंद्रात आतापर्यंत ६ कोटी मत्स्य बीज निर्माण झाले आहेत़ या बिजाचे संचय तलावात योग्य प्रकारे संगोपन केले जाते त्यानंतर मासे विक्रीसाठी काढले जात होते; परंतु आता ही सर्व प्रक्रिया ठप्प आहे़ परराज्यात मागणी मांजरा धरणातील माशांना पराराज्यातही मागणी आहे़ कटला़ राहू, मृगल, सायप्रिन्स व वांबट या जातीचे मासे धरणात आढळतात़ हैदराबाद, कोलकत्ता, पुणे, नागपूर, सोलापूर या शहरांमध्येही इथले मासे चवीने खाल्ले जातात़ मच्छीमारांनी जगायचं कसं? मच्छीमारांचा संसार मासेमारीवर अवलंबून आहे़ मत्स्य बीज निर्मिती केंद्र बंद झाल्याने मच्छीमार कुटुंबियांची रोजी रोटीच हिरावली आहे़ अनेकांनी पर्यायी साधने निवडली आहेत़ मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय टिकला पाहिजे, यासाठी प्र्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा लक्ष्मण सोनवणे यांनी व्यक्त केली़
मत्स्यबीज निर्मिती केंद्राला घरघर !
By admin | Updated: May 13, 2014 01:15 IST