(स्टार १२२७)
प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात ५ टक्क्यांनी कपात केल्याचा क्षुल्लक परिणाम, स्थानिक बाजारावर दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल दुप्पट भाववाढ झाल्यानंतर आता पाम, सोयाबीन, सूर्यफूल व शेंगदाणा तेलाच्या भावात लिटरमागे जेमतेम ५ रुपये कमी झाले आहेत. येत्या १५ दिवसांत आणखी भाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खाद्यतेलाचे भाव १५० ते २०० रुपये यादरम्यान जाऊन पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी फोडणी महागली आहे. वाढत्या महागाईमुळे चोहोबाजूंनी टीका हाेऊ लागल्याने केंद्र सरकारने कच्चे आयात शुल्कात ५ टक्क्यांनी कपात केली. पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क ५ टक्के कमी होऊन २४.७५ ते ३५.७५ टक्के झाले. देशात ऐन काढणीच्या हंगामात सोयाबीनचे भाव कमी झाले. यामुळे किरकोळ विक्रीत सोयाबीन तेल ५ रुपयांनी कमी होऊन १४५ रुपये, पामतेल १३० रुपये, सूर्यफूल तेल १५५ रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे. सध्या सरकीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. तर शेंगदाण्याचे उत्पादन वाढले. यामुळे पहिल्यांदाच सरकी तेलाच्या भावाने शेंगदाणा तेलाचे दर गाठले आहे. बाजारात शेंगदाणा तेल १५० ते १५५ रुपये तर सरकी तेल १५२ रुपये लिटर विकते आहे.
चौकट
खाद्यतेलाचे दर (प्रतिलिटर)
खाद्यतेल ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन तेल १५० रु. १४५ रु.
सूर्यफूल तेल १६० रु. १५५ रु.
पामतेल १३५ रु. १३० रु.
शेंगदाणा तेल १५५ रु. १५० रु.
सरकी तेल १५२ रु. १५२ रु.
सरसो तेल १८० रु. १८० रु.
करडी तेल २०० रु. २०० रु.
---
म्हणून दर कमी झाले
केंद्र सरकारने आयात शुल्कात ५ टक्क्यांनी कपात केली. त्यात देशात सोयाबीनचे भाव गडगडले. यामुळे सोयाबीन तेल, पाम तेल, शेंगदाणा तेल व सूर्यफूल तेलाच्या भावात लिटरमागे ५ रुपयांनी घट झाली.
-जगन्नाथ बसैये,
खाद्यतेल व्यापारी
---
खाद्यतेलाचे भाव डोईजड
खाद्यतेलाचे भाव प्रतिलिटर १५० ते २०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. हे सर्वसामान्यांसाठी डोईजड झाले आहे. सर्व खाद्यतेलाच्या किमती १०० रुपये प्रतिलिटरपर्यंतच असाव्यात.
-संगीता चिन्ने,
गृहिणी
---
याला दिलासा कसा म्हणावा?
पितृपक्ष त्यानंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी एकानंतर एक सण येत आहे. सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाचे भाव कमी झाले तर त्याचा थोडासा दिलासा मिळणारच.
-सायली जोशी
---