सोमनाथ खताळ ,बीडराज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. मात्र या सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी कमी पडत असल्याचे सोमवारी निदर्शनास आले. सवलतीचे पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांची वाट पहात बसण्याची वेळ आली होती.बुधवारपासून सेमीस्टर परीक्षांना सुरुवात होत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासूनच महाविद्यालयांची दारे उघडली होती. आता या परीक्षा दोन ते तीन आठवडे चालणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाकडून सवलत दराचे पास मिळविण्यासाठी गर्दी केली होती. बीड शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. हे विद्यार्थी दररोज बसने ये-जा करतात.या विद्यार्थ्यांसाठी खास करुन मुलींसाठी एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी बीड बसस्थानकासह जिल्ह्यातील अनेक बसस्थानकात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेले आहेत. मात्र बीड बसस्थानकात सोमवारी कक्ष उघडण्याचा वेळ संपून गेला तरी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. दुपारी दोनच्या सुमारास पाहणी केली असता संगणकीय आरक्षण कक्ष व विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पासच्या कक्षासमोर विद्यार्थ्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे दिसून आले. हे विद्यार्थी या कर्मचाऱ्यांची वाट पहात होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची एवढी गर्दी असतानाही याठिकाणी ना स्थानक प्रमुखाचे लक्ष होते ना आगारप्रमुखांचे. येथील काही विद्यार्थ्यांनी स्थानक प्रमुखाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता स्थानक प्रमुख आपल्या कार्यालयातून गुल होते. त्यामुळे या कक्षातील कर्मचाऱ्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे हाल झाल्यामुळे संताप व्यक्त होत होता. महामंडळातील अधिकारी, कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी किती तत्पर आहेत? हे यावरुन दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र उपाशीपोटी पास मिळविण्यासाठी कक्षासमोर ताटकळत उभे राहावे लागले. विद्यार्थी संघटना यावर काय आक्षेप घेतात? याकडे लक्ष लागून आहे.प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी व प्रतिनिधींनी विभागीय नियंत्रक पी.बी. नाईक यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नाईक यांचा भ्रमणध्वनी दिवसभर ‘स्वीच आॅफ’ होता व कार्यालयातही नव्हते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते आजारी असल्याचे सांगण्यात आले. विभागीय वाहतूक अधिकारी जी.एम. जगतकर हे सुद्धा ‘कव्हरेज’ क्षेत्राच्या बाहेर होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी तक्रार करायची कोणाकडे ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पहिल्याच दिवशी पाससाठी विद्यार्थी होते ‘वेटींग’वर
By admin | Updated: October 28, 2014 00:59 IST