केदारखेडा : नळणी बु़ येथील तीन कुटुंबाच्या घरांना बुधवारी रात्री आग लागून संसारोपयोगी साहित्यासह रोख दोन लाख रुपयांच्या रोेकडसह पाच लाखांचे नुकसान झाले. या आगीत बकरी व बोकड होरपळून मृत्यूमुखी पडले आहे़ नळणी येथील तीन कुटुंबातील सदस्य उन्हाळा असल्याने बाहेर झोपलेले होते़ त्यावेळी ९ वाजेच्या दरम्यान या घरांना आग लागली़काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले़ तिन्ही घरांना आगीचा वेढा पडला होता़ ग्रामस्थांनी आग विझविण्याचा मोठा प्रयत्न केला़ परंतु तो अयशस्वी ठरला़ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते़ मात्र, तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. यात माजी सैनिकांची पत्नी मंगलबाई देवलाल लोदवाल यांच्या घरातील रोख एक लाख ९५ हजार रुपये, विवाहाचे साहित्य साठ हजार रुपये, संसारोपयोगी साहित्य पन्नास हजार रुपये, धान्य पंचवीस हजार रुपये, लॅपटॉप पंचवीस हजार रुपये अशा प्रकारे जवळपास अदांजे साडेतीन ते चार लाख रुपयाचे नुकसान झाले आहे़ संजय मोहन लोदवाल यांचे संसारोपयोगी साहित्यासह धान्य, कपडे, बकरी, बोकड जळाल्याने ७० ते ७६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ लालसिंग भावसिंग लोदवाल यांचे संसारपयोगी साहित्यासह धान्य, कपडे आदी आगीत भस्मसात झाले असल्याने पन्नास ते साठ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे़ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. घटनेचा पंचनामा तलाठी मांटे यांनी केला. (वार्ताहर)
नळणीत तीन घरांना आग
By admin | Updated: April 14, 2017 00:58 IST