जालना : वडिलांचा खून झाला असून, त्यांच्या मोरकऱ्यांचा शोध लावा अशी फिर्याद दिलेला मुलगाच वडिलांचा मारेकरी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मुलगा नारायण त्र्यंबक झुटे व अन्य एकावर घनसावंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.याविषयी अधिक माहिती अशी की, नारायण त्र्यंबक झुटे याने १९ फेब्रुवारी २०१७ रोजी घनसावंगी पोलीस ठाण्यात वडिलांचा खून झाल्याची फिर्याद देत दोघांवर संशय व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी नारायण झुटे याने पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज देऊन वडिलांच्या खुनाच्या गुन्ह्यात दिलेली आरोपींची नावे मी दिली नसून पोलिसांनी माझी स्वाक्षरी घेऊन गुन्हा दाखल केला आहे. त्या आरोपींबाबत तक्रार नसल्याचे अर्जात म्हटले आहे. या प्रकाराने पोलीस गोंधळून गेले. या तक्रार अर्जावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी सदर गुन्ह्याबाबत सखोल माहिती घेण्यासाठी देवनगर येथे पथक पाठविले. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी फिर्यादी नारायण झुटे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सर्व हकिकत कथन केली. नारायण झुटे याने चुलत भाऊ रामेश्वर नामदेव झुटे याच्यासह १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्र्यंबक झुटे यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. वडील त्र्यंबक झुटे हे काही दिवसांपासून कुटुंबातील व नात्यातील महिलांची छेडछाड करून त्रास देत असल्याचे नारायण झुटे याने सांगितले. महिनाभरापूर्वीच चुलत भावाच्या मदतीने वडिलांचा खून करण्याचा डाव रचल्याचे सांगून रामेश्वरच्या सांगण्यावरून गावातील दोघांवर संशय घेऊन त्यांना गुन्ह्यात गोवल्याची त्याने कबुली दिली.
अखेर फिर्यादी मुलगाच निघाला वडिलांचा मारेकरी
By admin | Published: February 26, 2017 12:43 AM