आशपाक पठाण , लातूरमहिनाभरापासून चर्चा सुरू असलेल्या महापौर निवडीचा मुहुर्त ठरला असून १२ नोव्हेंबर रोजी लातूर शहर महानगरपालिकेच्या नव्या महापौराची निवड करण्यात येणार आहे़ महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नेत्यांकडे लॉबिंग सुरू केली आहे़ ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या महापौरपदासाठी चार जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ नेत्यांची पसंती नेमकी कोणाला मिळणार हे दहा दिवसांत स्पष्ट होणार आहे़लातूर शहर महापालिकेत काँग्रेसचे बहुमत आहे़ ७० पैकी ५० नगरसेवक काँग्रेसचे आहेत़ त्यात ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या चार जणांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा लागली आहे़ उघडपणे नेत्यांकडे लॉबिंग करण्यात येत नसली काही जणांनी नेत्यांच्या मर्जीतील प्रमुख कार्यकर्त्यांकडून आपणच कसे सरस राहू, असा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न चालविला आहे़ काही जणांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशात आमचा वाटा अधिक असल्याने संधी आम्हालाच मिळायला हवी, असा अट्टाहास सुरू केला आहे़ आरक्षण जाहिर झाल्यापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी संधी आपल्यालाच असल्याची चर्चा सुरू केली आहे़ लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा प्रभाग समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, स्थायी समितीचे माजी सभापती राम कोंबडे यांच्या नावाची शहरात जोरदार चर्चा आहे़ त्याचबरोबर माजी दिवाबत्ती सभापती असगर पटेल, स्थायी समितीचे विद्यमान सभापती अख्तर मिस्त्री यांच्यापैकी एकास संधी मिळेल, अशाही चर्चा आहेत़ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली मतांची आघाडी व माजीमंत्री अमित देशमुख यांनी केलेल्या घोषणेनुसारच महापौरपदाची माळ ‘त्या’ नगरसेवकाच्या गळ्यात पडणार आहे़ तरूण तडफदार व अभ्यासू सभापती म्हणून विक्रांत गोजमगुंडे यांची ओळख आहे़ तर शांत, संयमीपणे सर्वांच्या होकारात होकार देत काम करण्याची पध्दत स्थायी समितीचे माजी सभापती राम कोंबडे यांच्यात आहे़ दिवाबत्ती सभापती असताना अजगर पटेल यांच्या कार्यपध्दतीची चांगलीच चर्चा झाली होती़ स्थायी समितीचे विद्यमान सभापती अख्तर मिस्त्री यांच्या नावालाही नेत्यांकडून पसंती मिळू शकते़ आर्थिक डबघाईत असलेली महापालिका चालविण्याची क्षमता व आगामी काळात पक्षाला फायदा मिळेल, अशाच नावावर महापौर पदाचा शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे़
अखेर महापौर निवडीचा मुहूर्त ठरला
By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST