लोहारा : जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरूवातही केली आहे. परंतु, लोहारा तालुक्यात मात्र अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढील काळात पाऊस येईल, या आशेवरच गेल्या दोन दिवसांपासून तिफरीवर मूठ धरल्याचे दिसत आहे. तालुक्यातील शेती ही पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९ मिमी असून, गेल्या चार-पाच वर्षातील पावसाची आकडेवारी पाहता गतवर्षीच पावसाने सरासरी ओलांडल्याचे दिसते. त्यामुळे यंदा विहिरी, विद्युत पंपांना मुबलक पाणीसाठा राहिला. पर्यायाने यंदा नागरिकांना उन्हाळ्यातही टंचाईची तीव्रता जाणवली नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने चांगली हजेरी लावली असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्याही सुरू केल्या आहेत. परंतु, लोहारा तालुक्यात मात्र जेवळी, हिप्परगा (रवा), बेलवाडी, तोरंबा, फणेपूर, वडगाव हा भाग वगळता इतरत्र मात्र अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे ज्या भागात थोडाफार पाऊस झाला, तेथील शेतकऱ्यांनी यापुढील काळात मोठा पाऊस येईल, या आशेवर पेरण्यांना सुरूवात केली आहे. तर आतापर्यंत तालुक्यात केवळ चार टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विस्ताराधिकारी ए. पी. काळे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने अनेक ठिकाणी विहिरींचे पाणी आटले असून, विद्युत पंपही उचक्या देत आहेत. शिवाय, काही शेतकऱ्यांचा ऊसही पाण्याअभावी वाळून जात आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. (वार्ताहर)
अखेर पावसाच्या आशेवरच धरली चाड्यावर मूठ
By admin | Updated: July 12, 2014 01:15 IST