जालना : औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यूनंतर तब्बल महिनाभर बेवारस स्थितीत पडलेल्या जालन्यातील ‘त्या’ महिलेवर औरंगाबादेत सुर्योदय या सेवाभावी संस्थेच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची अधिक चौकशी सोमवारी केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी दिली.शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या छाया अण्णासाहेब जाधव (४०) ही मार्च महिन्यात भाजली होती. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, तिचा १६ जून रोजी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसात झालेल्या नोंदीनुसार पत्ता आणि नाव चुकीचे देण्यात आल्याचे आढळून आले. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये ही महिला भाडेतत्त्वाने राहात होती. ती व्यक्ती तेथे वास्तव्यासच नसल्याचे उघडकीस आले आहे. लोकमतच्या अंकात यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच पोलिस प्रशासनाने रविवारीच सुर्योदय या संस्थेचे अंबादास दानवे, सोमनाथ बोंबले, राजेंद्र दानवे, संतोष तमल, अंकुश गव्हारे यांच्या मदतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना देण्यात आलेला पत्ता हा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी छाया अण्णासाहेब जाधव नामक महिला भाजली होती. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबतची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे समजते. विशेष म्हणजे ही महिला वास्तव्यास होती तो पत्ताही बनावट आढळून आला आहे . तर नावही खरे आहे की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. वरवर पाहता ही केवळ घटना आहे की घातपात हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पोलिस तपासात सत्यता पुढे येईलच पण तरीही ही महिला कोण प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
अखेर ‘त्या’ महिलेवर सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार
By admin | Updated: July 18, 2016 01:01 IST