तालुक्यातील मुदत संपलेल्या ८३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता आर. पी. निकाळजे ( जिल्हा परिषद बांधकाम, पंचायत समिती, सिल्लोड) व शाखा अभियंता के.एस.गाडेकर (सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सिल्लोड) यांची ३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक निर्णय पथकाच्या कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी त्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य होते; परंतु हे दोन्हीं अभियंता गैरहजर राहिले. यामुळे निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय कामकाजात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टाळाटाळ केल्याने २४ डिसेंबर रोजी तहसीलदारांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. २४ तासांत खुलासा करण्याचे त्यात नमूद केले होते. शाखा अभियंता के.एस. गाडेकर यांनी लेखी खुलासा न केल्याने सोमवारी मंडळ अधिकारी विनोद धोकटे यांनी त्यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक बैठकांना गैरहजर राहणाऱ्या अभियंत्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST