औरंगाबाद : ‘बँकेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी, नाही कोणाच्या लुटीसाठी,’ अशा घोषणा देत देशातील बड्या कर्जबुडव्यांविरोधात आज बँक कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद केला. जाणीवपूर्वक बडी कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांना फौजदारी गुन्हा लागू करा, सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करू नका, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा बँक कर्मचारी असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. बँक राष्ट्रीयीकरणाच्या ४५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अशा प्रकारची निदर्शने करण्यात आली. सिडकोतील स्टेट बँक आॅफ हैदराबाद बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर सायंकाळी ५ वाजता निदर्शने करण्यासाठी बँक कर्मचारी जमा झाले होते. याचे नेतृत्व असोसिएशनचे अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर यांनी केले.नवीन भाजपा सरकारही सार्वजनिक बँकविरोधी असून या सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करण्याचा त्यांचा मनसुबा अर्थसंकल्पातून व्यक्त झाला आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमुळेच भारतातील आर्थिकव्यवस्था टिकून राहिली, हे त्यांनी यावेळी निर्दशात आणून दिले. इन्कम टॅक्स बुडविणाऱ्यांची यादी जाहीर केली जाते, त्याच धर्तीवर बँकेचे कर्ज बुडविणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात यावी, बड्या कॉर्पोरेट उद्योगपतींना नवीन बँकांचे परवाने देऊ नका. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण ग्राहक विरोधी आहे. स्टेट बँकांच्या सहयोगी ५ बँकांच्या कायद्यातून मुक्त करा, आदी मागण्यांची माहिती रवी धामणगावकर यांनी दिली. निदर्शनात बी.एन. देशमुख, सुनीता गणोरकर, बबन खर्डेकर, सतीश देशपांडे, अजय पाटील, राकेश बुरबुरे, कुमुदिनी देशमुख, जयश्री जोशी, सुहासिनी देशमुख यांच्यासह बँक कर्मचारी हजरहोते. गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर करण्याचा निर्धारचीट फंड घोटाळा, केबीसी घोटाळा आदी घोटाळ्यांत सर्वसामान्य गुंतवणूकदाराची आर्थिक लूट होत आहे.गुंतवणूकदारांनी कुठे पैसा गुंतवावा, त्यांचा पैसा कुठे सुरक्षित राहील, याची माहिती देण्यासाठी गुंतवणूकदरांना आर्थिक साक्षर करण्याचा विडा बँक कर्मचाऱ्यांनी उचलला आहे. सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण रोखणे, बँकेचे कर्ज बुडवून जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे बडे उद्योजक या विरोधात लढ्यात जनतेला सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी सर्वप्रथम गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर करण्यात येणार असल्याची घोषणा देवीदास तुळजापूरकर यांनी केली.?
कर्जबुडव्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST