औरंगाबाद : विकासाच्या मुख्य प्रवाहात मराठवाड्याला सामावून घेतले जाईल. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून शहिदांना अभिवादन करून ध्वजारोहण केले. त्यानंतर ते उपस्थिताना संबोधित करीत होते. ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाडा मुक्तिसंग्राम हे महत्त्वपूर्ण पर्व आहे. ब्रिटिश सत्तेला दिलेल्या लढ्यापेक्षा हा संघर्ष अधिक कठीण होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखा नि:स्वार्थी, त्यागी, निष्क लंक नेता लाभल्यामुळे हा संघर्ष यशस्वी झाला. त्यांनीच या मुक्ती लढ्यास जनआंदोलनाचे स्वरूप दिले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, आ. सुभाष झांबड आ. डॉ. कल्याण काळे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहण्यात आले. पोलीस दलाने हवेत २१ राऊंड फायर करून हुतात्म्यांना सलामी दिली. कार्यक्रमस्थळी उपस्थित मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
लढा व्यर्थ होऊ दिला जाणार नाही -मुख्यमंत्री
By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST